सेंट लूसिया : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) पराभूत केलं आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्मासह टीम इंडियाच्या खेळाडूंनी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. ऑस्ट्रेलियावरील विजयासह भारतानं उपांत्य फेरीच्या लढतीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड (Ind vs Eng) असा सामना 27 जून रोजी होणार आहे. हा सामना पावसामुळं रद्द झाल्यास टीम इंडियाला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीची लढत 27 जूनला प्रोविडेन्स स्टेडियम, गयाना येथे होणार आहे. सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये पहिलं स्थान पटकावत भारतानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 


सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये पहिल्या स्थानावर असल्याचा भारताला मोठा फायदा होणार आहे. हवामानाच्या अंदाजानुसार गयानामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील मॅचच्या दिवशी मुसळधार पाऊस होऊ शकतो. गयानाच्या स्टेडियमवर ओलं झालेलं मैदान कोरडं करण्यासाठी तगडी यंत्रणा नाही. त्यामुळं मॅचपूर्वी पाऊस झाल्यास आयसीसीला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. आयसीसीनं सेमी फायनल 2 साठी राखीव दिवस ठेवलेला नसल्याचा फायदा देखील टीम इंडियाला होऊ शकतो. पावसामुळं मॅच रद्द टीम इंडिया थेट टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते. दक्षिण आफ्रिका आणि ग्रुप 1 मधील दुसरा संघ यांच्यात पहिली सेमी फायनल होणार आहे. त्या मॅचसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 


रोहित शर्माची धडाकेबाज कामगिरी


टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं धडाकेबाज फलंदाजी करत 92 धावांची खेळी केली. रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाचं बलस्थान असलेल्या वेगवान गोलंदाजांविरोधात हल्लाबोल केला. मिशेल स्टार्कला रोहित शर्मानं एका ओव्हरमध्ये 29 धावा काढल्या. टीम इंडियानं 20 ओव्हरमध्ये 205 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड आणि मिशेल मार्शनं टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मिशेल मार्श षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. 


रोहितसेना 2022 मधील सेमी फायनलचा बदला घेणार?


रोहित शर्माच्या टीम इंडियाकडे 2022 च्या टी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. 


दरम्यान, भारतानं ग्रुप स्टेजमध्ये आयरलँड, पाकिस्तान, अमेरिका यांना पराभूत केलं होतं. सुपर 8 मध्ये भारतानं सर्व सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. 


संबंधित बातम्या :


 बदला घेतलाच..! भारताचा ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय, कांगारु वर्ल्डकपमधून आऊट होण्याच्या मार्गावर


रो'हिट' शर्माचं वादळ घोंगावलं, ऑस्ट्रेलियानं गुडघे टेकले; स्टार्क-कमिन्सचा धुरळा उडवला! विक्रमाची रांग