T20 World Cup 2024 Ind vs SA Final: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान कर्णधार रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येत आहे. मात्र विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. विराट कोहलीने 7 डावात फक्त 75 धावा केल्या आहे. ज्यामध्ये त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे. कोहलीला 7 डावांपैकी 5 वेळा दुहेरी आकडाही गाठता आला नाही, असे असतानाही भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोहलीच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. 


सौरव गांगुली नेमकं काय म्हणाला?


विराट कोहलीने सलामीला येणं सुरु ठेवावं. अवघ्या 7 महिन्यांपूर्वी झालेल्या विश्वचषकात त्याने 700 हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली देखील माणूस आहे, कधी कधी तो अपयशी देखील होतो आणि हे अपयश कसे स्वीकारायचे हे तुम्हाला कळले पाहिजे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारखे खेळाडू ही भारतीय क्रिकेटची व्याख्या आहे. 3-4 सामने विराट कोहलीला कमकुवत खेळाडू बनवू शकत नाहीत. अंतिम फेरीतही आपण त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, असं सौरव गांगुली यांनी सांगितले.


टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा सलामीचा विक्रम


आजपर्यंत विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 16 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 33.93 च्या सरासरीने 475 धावा केल्या आहेत. खरंतर, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, सलामीवीर म्हणून कोहलीने भारतासाठी 9 डावात 57.14 च्या उत्कृष्ट सरासरीने 400 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचाही समावेश होता. मात्र विश्वचषकातील 7 डावात केवळ 75 धावा केल्यामुळे त्याच्या सरासरीत कमालीची घसरण झाली आहे. कोहलीने 3 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी 3,000 हून अधिक धावा केल्या आहेत.


कोहली अंतिम सामन्यात मोठी खेळी करेल- 


'कोहली फायनलमध्ये मोठी खेळी करेल, असा विश्वास वाटतो. तो प्रतिभावान आही, पण कोणताही खेळाडू 'बॅड पॅचमधून' जातोच. मोठ्या सामन्यात त्याचे महत्त्व आम्ही समजू शकतो, असं रोहित शर्माने सांगितले. तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, कोहली जेव्हा जोखीम पत्कारून खेळतो, तेव्हा काहीवेळा तो अपयशी ठरतो. पण तो ज्या पद्धतीने  खेळतो, ती पद्धत मला आवडते, तो लवकरच मोठी खेळी करेल, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!