T20 World Cup 2024 Ind vs SA Final: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024)स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरु होईल. मात्र याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये 75 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे अंतिम सामन्याला उशीर झाल्यास, त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागू केला जाईल. दोन्ही संघ प्रत्येकी किमान 10 षटके खेळतील तेव्हाच सामन्याचा निकाल कळू शकेल. जर दोन्ही संघ 10-10 षटके खेळू शकले नाहीत तर सामना राखीव दिवशी खेळवण्यात येईल.
राखीव दिवशीही पाऊस पडला तर...
आयसीसीच्या नियमानुसार अंतिम सामना न झाल्यास किंवा टाय झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येते. राखीव दिवशीही कोणताही संघ विजेता होऊ शकला नाही आणि सुपर ओव्हर देखील शक्य नसेल तर अंतिम सामन्याचा निकाल 'अर्निणित' म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. मात्र टी-20 विश्वचषकाच्या 17 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.
आयसीसीचे नेमके नियम काय?
1. रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आला तरी रात्री 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत षटकांची संख्या कमी केली जाणार नाही. त्यानंतर मात्र षटकांची संख्या कमी केली जाईल.
2. आयसीसीच्या नियम 13.7 आणि 13.6 नुसार पावसाच्या स्थितीत अतिरिक्त 190 मिनिटांचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे.
3. भारतीय वेळेनुसार रात्री 12 वाजून 10 मिनिटांनंतर 10-10 षटकांचा सामना खेळविण्याचा प्रयत्न असेल. जर काही षटकांनंतर पावसाने हजेरी लावल्यास 20-20 षटके दुसऱ्या दिवशी पूर्ण केली जातील.
4. राखीव दिवसाचा निर्धारित वेळ पावसाच्या व्यत्ययात नष्ट झाल्यास भारतीय वेळेनुसार रात्री 12.10 नंतर 190 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत 10-10 षटके पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही पावसामुळे 10-10 षटकांचा खेळ होणार नसेल तर आयसीसीच्या नियम 16.10 नुसार 'सुपर ओव्हर' करण्यात येईल. सुपर ओव्हरदेखील शक्य न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
दोन्ही संघांची कामगिरी-
भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा पराभव केला. आता अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. आयर्लंडसह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तान, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केले आहे.
संबंधित बातम्या:
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!