ENG vs OMAN T20 World Cup 2024 : एंटीगुआ येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने ओमानचा दारुण पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा केला, त्यानंतर फलंदाजांनी विस्फोटक खेळी केली. इंग्लंडने ओमानवर 8 विकेटने सनसनाटी विजय मिळवला. इंग्लंडने फक्त 19 चेंडूमध्ये विराट विजय नोंदवला. इंग्लंडने या रेकॉर्डब्रेक विजयासह सुपर 8 मधील आपलं आव्हान जिवंत ठेवलेय. इंग्लंडनं ओमानविरोधात रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद केली. गोलंदाजांनी आधी ओमानचा फक्त 47 धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर हे आव्हान दोन विकेट आणि 19 चेंडूमध्ये सहज पार केले. फिरकी गोलंदाज आदिल रशीद याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.  


ओमानचा 47 धावात खुर्दा 


इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या ओमानचा डाव फक्त 47 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडच्या भेदकम माऱ्यापुढे 10 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. शोएब खान यानं 23 चेंडूत 11 धावांची खेळी केली. ही ओमानकडून सर्वोत्तम खेळी ठरली. कर्णधार आकिब याला फक्त आठ धावाच करता आल्या. खालिद एक धाव काढून बाद झाला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद यानं भेदक गोलंदाजी केली. रशीद यानं चार षटकात 11 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना तंबूत धाडले. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.  






फक्त 19 चेंडूत इंग्लंडनं विजय मिळवला - 


ओमानने दिलेल्या 48 धावांचे आव्हान इंग्लंडने फक्त 19 चेंडूमध्ये पार केले. त्यासाठी इंग्लंडला दोन विकेट गमवाव्या लागल्या. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने अखेरपर्यंत पाय रोवून फलंदाजी केली. फिलीप सॉल्ट याने 3 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले. विल जॅक्स याला फक्त पाच धावा करता आल्या. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने 8 चेंडूमध्ये नाबाद 24 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला.जॉनी बेअरस्टो 8 धावा काढून नाबाद राहिला. 






 
सुपर 8 च्या आशा जिवंत -


इंग्लंडने ओमानविरोधात मोठ्या फरकाने विजय नोंदवला. विराट विजयामुळे इंग्लंडचा नेट रनरेट चांगला झालाय. त्यामुळे इंग्लंडच्या सुपर 8 मध्ये पोहचण्याचा आशा जिवंत राहिल्या आहेत. इंग्लंडला अखेरच्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. इंग्लंडचा अखेरचा सामना नामिबियासोबत आहे. 15 जून रोजी हा सामना होणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या गुणातालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्कॉटलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर स्कॉटलँडचा पुढील सामन्यात पराभव झाला तर इंग्लंडच्या सुपर 8 चा रस्ता आणखी सोपा होणार आहे.