सेंट लूसिया : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली. अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ग्लेन मॅक्सवेलची (Glane Maxwell) गुलबदीन नैबनं घेतलेली विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.
ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानचे सलामीवर रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झदरान या दोघांनी शतकी भागिदारी केली. दोंघांनी अर्धशतकं करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी अफगाणिस्तानला 118 धावांची सलामीची भागिदारी करत मॅचमध्ये पुढं ठेवलं. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांना मोठी दावसंख्या उभारता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमबॅक करत अफगाणिस्तानला 148 धावांवर रोखलं. पॅट कमिन्सनं हॅटट्रिक देखील याच मॅचमध्ये केली.
अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सेवलचं वादळ
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेड आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ट्रेविस हेड ला नवीन-उल-हकनं शुन्यावर बाद केलं. यानंतर डेव्हिड वॉर्नर देखील केवळ 3 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिशेल मार्श देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. नवीन-उल-हकनं मिशेल मार्शला 12 धावांवर बाद केलं. यानंतर ट्रेविस हेड आणि टीम डेविड देखील लवकर बाद झाले. एका बाजूनं ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी सुरु होती. ग्लेन मॅक्सवेलनं 3 षटकार आणि 6 चौकार मारत 59 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल 2023 च्या वनडे वर्ल्ड कपप्रमाणं ऑस्ट्रेलियाला एकहाती मॅच जिंकवून देणार असं वाटू लागलं होतं. मात्र, गुलबदीन नैबच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. नूर अहमदनं ग्लेन मॅक्सवेलचा घेतलेला कॅच गेमचेंजर ठरला.
ग्लेन मॅक्सवेलची विकेट टर्निंग पॉइंट
ग्लेन मॅक्सवेल आक्रमक फलंदाजी करत असल्यानं तो एकहाती मॅच जिंकेल, अशी शक्यता निर्माण झालेली होती. याच वेळी राशिद खाननं गुलबदीन नैबला गोलंदाजी दिली. गुलबदीनच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मॅक्सवेलनं केला. मात्र, मॅक्सवेलनं मारलेला बॉल थेट नूर अहमदच्या हातात गेला. यानंतर मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, एस्टन एगर, अॅडम झाम्पा हे बाद झाले. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नैबनं 4 तर नवीन उल हकनं 3 विकेट घेतल्या. तर, आझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी आणि राशिद खाननं एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या