T20 World Cup 2021: विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाला समोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारताचा दहा विकेट्सनं पराभव करत इतिहास रचला. आतापर्यंत विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानकडून एकदाही पराभवूत झालेला नव्हता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. विराट-पंत वगळता इतर फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे नांगी टाकली. भारतीय संघानं दिलेलं 152 धावांचं आवाहन पाकिस्तान संघाने एकही विकेट्स न गमावता पार केलं. सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीनं पराभव स्वीकारात स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकाराची बोलती बंद केली. इशान किशनचा सध्याचा फॉर्म पाहाता पुढील सामन्यात रोहित शर्माला संघाबाहेर बसवणार का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला होता. 


रोहित शर्माला संघाबाहेर ठेवणार का? या प्रश्नावर विराट कोहलीला पहिल्यांदा हसू आवरले नाही. स्वत:ला सावरुन आश्चर्यचकित होत तो म्हणाला की, तुम्ही रोहित सारख्या फलंदाजाला टी-20 संघातून बाहेर काढणार?…हे खरेच अविश्वसनीय आहे. रोहित हा क्रिकेटविश्वातील अव्वल दर्जाचा फलंदाज मानला जातो. तुम्हाला वाद हवाय... तसं असेल तर आधी सांगत चला... त्याप्रमाणे मी बोलत जाईल, असं म्हणत विराट कोहलीनं पत्रकाराचं तोंड बंद केलं. संघाचं संतुलन नव्हतं का? यावर बोलताना विराट कोहली म्हणाला की, माझ्या दृष्टीनं जो संघ बेस्ट असेल त्यानुसार मी उतरलो आहे. 


पाकिस्तानविरुद्ध झालेला पराभव विराट कोहलीनं मान्य केला. सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की,  'आम्ही आमची योजना योग्य प्रकारे अंमलात आणू शकलो नाहीत. आमचे सलामीवीर झटपट बाद झाले. अशावेळी सामन्यात पुनरागमन करणे कठीण असते. मैदानातील दव पाहता कठीण होते. पाकिस्तानने दर्जेदार गोलंदाजी केली. आमचा संघ घाबरणारा नक्कीच नाही. ही स्पर्धेची सुरुवात आहे शेवट नाही. '






दरम्यान, दुबई येथे झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावला सामोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारतीय संघाचा दहा विकेटनं पराभव केला. नाणेफेकीपासूनच सर्व काही भारतीय संघाच्या विरोधात गेलं. पहिल्या चेंडूपासून पाकिस्तान संघानं मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवली. विश्वचषकात पाकिस्तानकडून पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव झाला. नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करता आल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात पार केलं. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आगामी सामन्यापूर्वी भारतीय संघ या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल.