Syed Mushtaq Ali Trophy 2023 Day 1 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 ची आजपासून दिमाखात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे खेळाडू चमकले आहेत. महाराष्ट्राकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड, मुंबईकडून खेळणारा अजिंक्य रहाणे आणि विदर्भाकडून खेळणारा जितेश शर्मा यांनी वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय केदार जाधव याने महत्वाची खेळी केली. मुंबई, विदर्भ आणि महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली चषकाची विजयी सुरुवात केली आहे.


ऋतुराजचा जलवा, महाराष्ट्राचा पहिला विजय -


पश्चिम बंगालविरोधात महाराष्ट्राने आठ विकेटने विजय मिळवला. या विजयात ऋतुराज गायकवाड याने वादळी खेळी केली. ऋतुराज गायकवाड याने 40 चेंडूत 205 च्या स्ट्राईक रेटने 82 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये ऋतुराज गायकवाडने 9 चौकार आणि 5 षटकारही ठोकले. गायकवाडच्या वादळी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली चषकाच्या सलामी सामन्यात विजय नोंदवला. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव याने दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली. 






अजिंक्य रहाणेचं वादळी अर्धशतक - 


अजिंक्य रहाणे याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली आहे. अजिंक्य रहाणे याने 43 धावांत वादळी नाबाद 76 धावांची खेळी केली. या खेळीत रहाणे याने सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. कठीण परिस्थितीत अजिंक्य रहाणे याने शतकी खेळी केली. हरियाणाने दिलेले 148 धावांचे आव्हान मुंबईने रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहज पार केले. मुंबईने हरियाणाचा आठ विकेटने सहज पराभव केला. रहाणेच्या खेळीचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. यशस्वी जायस्वाल झटपट बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे याने मुंबईला विजय मिळवून दिला. 






युवा जितेश शर्माचे वादळ - 


विदर्भाचा युवा जितेश शर्मा यानेही वादळी फलंदाजी केली. जितेश शर्माने 284 च्या स्ट्राईकरेटने फलंदाजी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत जितेश शर्मा याने 18 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये जितेश शर्माने तीन चौकार आणि पाच षटकारांचा पाऊस पाडला. जितेशच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर विदर्भाने सलामीच्या लढतीत उत्तराखंडच पराभव केला. उत्तराखंडने दिलेले 142 धावांचे आव्हान विदर्भाने 11.2 षटकार पार केले. पावसामुळे हा सामना 13 षटकारांचा खेळवण्यात आला होता.