Syed Mushtaq Ali Trophy 2021 : युवा शाहरुख खान याने अखेरच्या षटकात केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर तामिळनाडूने तिसऱ्यांदा सय्यद मुश्तक अली चषकावर नाव कोरलं आहे. एका चेंडूत विजयासाठी पाच धावांची गरज असताना शाहरुख खान याने षटकार मारत तामिळनाडूला जेतेपद मिळवून दिलं. शाहरुखच्या तुफानी फटकेबाजीमुळे कर्नाटक संघाचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळालं. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाने कर्नाटकचा चार गड्यांनी पराभव केलाय. शाहरुख खान याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. शाहरुख खान याने 15 चेंडूत 33 धावांची तुफानी खेळी करत विजय खेचून आणला. 


प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटक संघाने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 151 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्नाटककडून अभिनव मनोहर आणि प्रविण दुबे यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. अभिनव मनोहर याने 46 तर प्रविण दुबे यांने 33 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता दिग्गजांना आपली छाप सोडता आली नाही. कर्णधार मनिष पांडे, करुण नायर आणि रोहन कदम यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. तामिळनाडूकडून आर. साईकिशोर याने भेदक मारा केला. साई किशोर याने चार षटकांत 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. 


152 धावांच्या आव्हानाचा पाळलाग करणाऱ्या तामिळनाडू संघाची सुरुवात समाधानकारक झाली. पण लागोपाठ विकेट पडल्यानंतर तामिळनाडूचा डाव संकटात सापडला होता. नारायण जगदीशन याने एक बाजू लावून धरली होती. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नव्हती. नारायण जगदीशन याने 41 धावांची खेळी केली. विजय शंकर, साई सुदर्शन आणि संजय यादव यांच्या ठरावीक अंताराने विकेट पडल्यामुळे तामिळनाडूचा डाव अडखळला होता. मात्र, शाहरुख खान याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत विजय खेचून आणला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये तामिळनाडूने कर्नाटकवर चार गडी राखून मात मिळवली. शाहरुख खान याने 15 चेंडूत तीन षटकारासह 33 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत 16 धावांची गरज असताना शाहरुख खान याने तुफानी फटकेबाजी करत तामिळनाडूला जेतेपद मिळवून दिलं. 






शाहरुख खान याच्या विजयी फटकेबाजीची सोशल मीडियावर चर्चा आहे. चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी यानेही हा सामना पाहिला. धोनी शाहरुखची फलंदाजी पाहातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई शाहरुखवर बोली लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 






LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha