Suryakumar Yadav Reaction on Rohit Sharma Fitness मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंड विरुद्ध अंतिम फेरीत विजय मिळवण्याच्या इराद्यानं भारत मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत अंतिम फेरीत पोहोचला असतानाच एका नव्या वादाला सुरुवात झाली होती. ती म्हणजे रोहित शर्माचा फिटनेस होय. टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव रोहित शर्माच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी एका सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले होते. रोहित शर्माचा फिटनेस चांगला नसून तो छाप न पाडणारा कर्णधार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर शमा मोहम्मद यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
रोहित शर्माच्या फिटनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सूर्यकुमार यादवनं उत्तर दिलं आहे. सूर्यकुमार यादव एएनआय या वृत्तसंस्थेंशी संवाद साधत होता. त्यावेळी सूर्यकुमार यादवनं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं गेल्या चार वर्षात चार आयसीसी फायनल खेळल्याचं म्हटलं. रोहित शर्माला आपण कर्णधार म्हणून पाहिलं तर, गेल्या चार वर्षात टीमला आयसीसी फायनलमध्ये घेऊन गेला आहे. ही देशासाठी मोठी गोष्ट आहे. एक व्यक्ती जर 15 ते 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत असेल तर मोठी गोष्ट आहे. त्यासाठी फिटनेस किती महत्त्वाचा हे मी पाहिलं आहे. फ्रँचायजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो खूप मेहनत करतो. तो सध्या त्याच्या करिअरमध्ये टॉपवर आहे, फायनल मॅच जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मी भारताच्या नजरेतून पाहतो. मी पहिल्यांदा सांगितलं आहे की भारतीय क्रिकेट टीम चांगलं क्रिकेट खेळत आहे, असंच क्रिकेट खेळत राहिले तर फायनल ही फक्त आणखी एक मॅच असेल. आम्ही अशीच कामगिरी केली तर विजय मिळवणं अधिक कठीण होणार नाही.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं गेल्यावर्षी जून महिन्यात आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. त्यापूर्वी भारतानं आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या फायनल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
इतर बातम्या :