Sunil Gavaskar on Team India: चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chidambaram Stadium) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) तिसऱ्या वनडेत टीम इंडियाला (Team India) 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 1-2 नं गमावली. या पराभवासोबतच भारतीय क्रिकेट संघानं (India National Cricket Team) वनडे क्रमवारीत पहिला क्रमांकही गमावलं. टीम इंडियाच्या पराभवामुळे महान फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच नाराज दिसत आहेत.


गावस्कर यांचा टीम इंडियाला इशारा


31 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) ला सुरुवात करण्याच्या उत्साहात भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभव विसरण्याची चूक करू नये, असं सुनील गावसकर म्हणाले आहेत. गावसकर पुढे बोलताना म्हणाले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देशात आयोजित करण्यात येणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला त्याच प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागू शकतो.


सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बातचित केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "नक्कीच, आता आयपीएल (31 मार्चपासून) सुरू होत आहे. या मालिकेत मिळालेला पराभव विसरता कामा नये. टीम इंडिया कधी-कधी विसरण्याची चूक करू शकते, पण असं कोणी करू नये कारण विश्वचषकात आपल्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाशी दोन हात करावे लागू शकतात." 


ते म्हणाले की, "तो (तिसऱ्या वनडेतील पराभव) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी निर्माण केलेल्या दबावामुळे झाला. चौकार थांबले होते आणि ते (भारतीय फलंदाज) एकही धाव काढू शकले नाहीत. जेव्हा हे घडतं, तेव्हा तुम्ही असं काहीतरी खेळण्याचा प्रयत्न करता ज्याची तुम्हाला सवय नाही. त्यांना ही गोष्ट पहावी लागेल."


तिसऱ्या वनडेत कोहलीच्या सर्वाधिक धावा 


सामना जिंकण्यासाठी 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघ 49.1 षटकात 248 धावांवर गारद झाला, यामुळे सामन्यासह मालिकाही गमावली. भारतीय संघासाठी विराट कोहली (54 धावा) आणि केएल राहुल (32 धावा) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी आणि सलामीवीर रोहित शर्मा (30 धावा) आणि शुभमन गिल (37 धावा) यांच्यातील 65 धावांची भागीदारी महत्त्वाची होती. 


ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पानं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर म्हणाले, "जेव्हा तुम्ही 270 किंवा जवळपास 300 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला जवळपास 90 किंवा 100 धावांची भागीदारी आवश्यक असते जेणेकरून तुम्ही लक्ष्याच्या जवळ पोहोचता."


टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया ODI सीरीज (2023) 


पहिला सामना (मुंबई) : टीम इंडियाचा पाच विकेट्सनी विजय  
दूसरा सामना (विशाखापट्टणम) : ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सनी विजय 
तिसरा सामना (चेन्नई) : ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय 


सीरीजमध्ये सर्वाधिक धावा करणारे प्लेयर 


मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया) : 194 धावा 
केएल राहुल (टीम इंडिया) : 116 धावा 
ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया) : 89 धावा 
विराट कोहली (टीम इंडिया) : 89 धावा 
रवींद्र जडेजा (टीम इंडिया) : 79 धावा 


सीरीजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू 


मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : 8 विकेट 
मोहम्मद सिराज (टीम इंडिया) : 5 विकेट 
एडम जाम्पा (ऑस्ट्रेलिया) : 4 विकेट 
हार्दिक पंड्या (टीम इंडिया) : 4 विकेट 
सीन एबॉट (ऑस्ट्रेलिया) : 4 विकेट