मुंबई: क्रिकेट समालोचक आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी भारतीय संघात खेडाळूंशी भेदभाव केला जातोय, प्रत्येकाला वेगवेगळे नियम लावण्यात येतात असा आरोप केलाय. स्पोर्ट्स स्टार या मॅगेझिनसाठी लिहलेल्या एका कॉलममध्ये त्यांनी हा आरोप केलाय.
आपल्या लेखातून सुनिल गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यांनी सांगितलं की विराट कोहलीला पॅटर्निटी लीव्ह दिली जाते, तर टी. नटराजन आणि आर अश्निनसोबत वेगळा व्यवहार केला जातो.
सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला सपाटून मार खावा लागला आहे. त्यानंतर विराट कोहली पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात परत गेला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिक्य रहाणे टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
अश्विन एका सामन्यात अपयशी झाल्यानंतर संघाबाहेर
गावस्कर यांनी स्पोर्ट्स स्टार साठी लिहलेल्या आपल्या कॉलममध्ये म्हटलंय की, "रविचंद्रन अश्विन गेले अनेक वर्षे आपल्या गुणवत्तेमुळे संघात आहे. त्याने टीमच्या बैठकीत अनेक वेळा आपलं मत प्रदर्शित केलंय. त्याचा परिणाम म्हणून त्याला अनेक वेळा टीम बाहेर बसावं लागलंय. त्याचवेळी काही लोक असे आहेत की जे फक्त बैठकीत आपल्या माना डुलवतात."
त्यांनी पुढं म्हटलंय की, "ज्या गोलंदाजाच्या नावे 350 पेक्षा जास्त विकेट्स आहेत त्या गोलंदाजाला कोणतीही टीम बाहेर बसवणार नाही. त्याचसोबत अश्विनने चार कसोटी शतक देखील पटकावले आहेत. तो एका सामन्यात अपयशी ठरला तरी त्याला संघाबाहेर ठेवण्यात येतं. त्याचवेळी फलंदाजांना संधीवर संधी मिळत राहते. पृश्वी शॉने आपल्या अनुभवातून कोणताही धडा घेतला नाही. भारतीय संघात प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम आहेत."
सुनिल गावस्कर पुढं म्हणाले की, "आणखी एक गोलंदाज आहे ज्याच्यासाठी वेगळा नियम बनवण्यात आलाय. त्याचं नाव आहे टी नटराजन. तो याविरोधात काही बोलू शकत नाही कारण तो या संघात नवा आहे. या खेळाडूने टी-20 सामन्यादरम्यान चांगलं प्रदर्शन केलंय. हार्दिक पांड्यानेही आपली मॅन ऑफ द सीरीजची ट्रॉफी त्याला दिली होती. टी नटराजन हा आयपीएलच्या दरम्यानच बाप बनला होता. पण त्याला सरळ ऑस्ट्रेलिया दौऱ्याला नेण्यात आलं."
वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळा नियम
गावस्कर यांनी आपल्या लेखात पुढं म्हटलय की, "टी नटराजनने टी-20 मालिकेत चांगलं प्रदर्शन करुनदेखील त्याला आता संधी मिळत नाही. त्याला नेट बॉलरच्या स्वरुपात ठेवण्यात आलंय. त्याने पहिला घरी जायला हवं होतं आणि आपल्या मुलीचं तोंड पहायला हवं होतं. पण त्याला तशी मुभा दिली नाही. कोहली कर्णधार आहे म्हणून पहिला कसोटी सामना हारल्यानंतरही तो भारतात परत गेला. हेच भारतीय क्रिकेट आहे. इथं प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा नियम आहे."
गावस्कर यांनी या आधीही कोहलीवर टीका केलीय. आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान त्यांनी अनुष्का शर्मावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर गावस्कर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.