अहमदाबाद : भारताचे माजी कर्णधार आणि सलामीचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाचा पन्नासावा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या अहमदाबाद कसोटीच्या निमित्तानं बीसीसीआयच्या वतीनं गावस्कर यांचा स्मृतिचिन्ह प्रदान करुन गौरव करण्यात आला. बीबीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते गावस्करांचा एक खास ‘इंडिया कॅप’ देत सन्मान करण्यात आला.


त्या कॅपभोवतीच्या तावदानावर सहा मार्च 1971 ही तारीख कोरण्यात आली आहे. गावस्कर यांनी त्याच दिवशी वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत खेळून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.


बीसीसीआयने ट्वीट करत म्हटले आहे की, 'आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाची 50 वर्षे साजरी करत आहेत.'





जय शहा यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरुन या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे, की ' सुनील गावस्कर यांच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाची 50 वर्षे साजरी करत आहे. तसेच हा सर्व भारतीयांसाठी एक मोठा क्षण आहे की, आपण जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सोहळा साजरा करत आहोत’.


1983 च्या वर्ल्ड कप चॅम्पियन संघाचे सदस्य


गावस्कर यांनी 1971 ते 1987 या काळात भारतासाठी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय  सामने खेळत क्रमश: 10122 और 3092 धावा केल्या. सुनील गावस्कर 1983 च्या वर्ल्ड कप चॅम्पियन संघाचे सदस्य देखील होते. सचिन तेंडुलकरने 2005 मध्ये कसोटीतील सर्वाधिक शतक बनवण्याचा  रेकॉर्ड तोडला होता. गावस्करांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या डेब्यू सामन्यात पहिल्या डावात 65 तर दुसर्‍या डावात 67 धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना आणि मालिका देखील जिंकली होती.