Sri Lanka vs India 1st T20I Highlights: शानदार... जबरदस्त... टीम इंडियानं (Team India) श्रीलंकेविरोधातील (Sri Lanka) तीन सामन्यांच्या टी20 सीरिजची सुरुवात आपल्या विजयानं केली. तसं पाहायला गेलं तर, टीम इंडियासाठी हा विजय सोपा नव्हता, पण तरिसुद्धा टीम इंडियानं करून दाखवलं. टीम इंडियानं श्रीलंकेच्या हातातून विजय खेचून आणला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 27 जुलै रोजी पल्लेकेल इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेचा 43 धावांनी धुव्वा उडवला. सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं टार्गेट मिळालं होतं, पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.2 ओव्हर्समध्ये 170 धावांवर गारद झाला. 


निसांका-मेंडिसनं टीम इंडियाचं टेन्शन वाढवलेलं 


तसं पाहिलं तर श्रीलंकेला हरवणं टीम इंडियासाठी तसं फारसं सोपं नव्हतं. 213 धावा करूनही सामन्यात अशी वेळ आली होती, जेव्हा टीम इंडियाच्या हातातून सामना काहीसा निसटताना दिसत होता. यासाठी कारणीभूत ठरला, तो म्हणजे श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिस आणि पाथुम निसांका यांनी आपल्या संघाला शानदार सुरुवात करून दिली. निसांका-मेंडिसच्या जोडीनं 8.4 षटकांत 84 धावांची भागिदारी केली. या सलामीच्या भागीदारीनं श्रीलंकेचं टीम इंडियानं दिलेलं धावांचं आव्हान अगदी सोपं झालं होतं. 






हा होता सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट 


कुसल मेंडिस आऊट झाल्यानंतरही पथुम निसांका वादळासारखा टीम इंडियावर तुटून पडला होता. जणू त्याचं ध्येय स्पष्ट होतं. याच आवेशात तो नव्हतं करायला पाहिजे, तेच करुन बसला आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं. निसांकाच्या दमदार खेळीमुळे श्रीलंका 14 ओव्हर्समध्ये एक विकेट गमावून 140 धावांवर पोहोचली होती. म्हणजे शेवटच्या सहा ओव्हर्समध्ये श्रीलंकेला विजयासाठी 74 धावांची गरज होती. मात्र, यानंतर अक्षर पटेलनं भारतासाठी शानदार पुनरागमन केलं. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला तो, श्रीलंकेच्या डावातील 15 वी ओव्हर, ज्यामध्ये अक्षर पटेलनं दोन विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर आणलं आणि टीम इंडियासाठी विजयाची वाट सोपी करुन दिली.


अक्षर पटेलनं त्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला गोलंदाजी देऊन 56 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या सेटचा फलंदाज कुसल परेरालाही पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात आलं. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज एक एक करून पॅव्हेलियनमध्ये परतायला लागले. श्रीलंकेने 16व्या, 17व्या, 18व्या, 19व्या आणि 20व्या ओव्हर्समध्ये पुन्हा विकेट गमावल्या. एकूणच श्रीलंकेला पूर्ण 20 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत आणि शेवटच्या 9 विकेट्स 30 धावांत गमावल्या.


श्रीलंकेकडून पथुम निसांकानं सर्वाधिक 79 धावा केल्या. निसांकानं आपल्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार मारले. तर कुसल मेंडिसनं 27 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 45 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय कुसल परेरा (20) आणि कामिंडू मेंडिस (12) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. टीम इंडियाकडून रियान परागनं 5 धावांत तीन बळी घेतले. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंहनं 2-2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी एक विकेट चटकावली.


सूर्यादादाची कर्णधार पदाला साजेशी खेळी 


टीम इंडियानं टॉस गमावला, त्यानंतर श्रीलंकेनं सर्वात आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून सर्वात आधी फलंदाजी करताना सात गडी गमावून 213 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवनं 26 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं 33 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीनं 49 धावा केल्या. उपकर्णधार शुभमन गिलनं 16 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारांसह 34 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालनं 21 चेंडूत 41 धावांची खेळी केली. यशस्वीनं पाच चौकार आणि दोन षटकार मारले. श्रीलंकेसाठी मथिशा पाथिरानानं सर्वाधिक चार विकेट घेतल्या.