India vs South Africa 1st Test : भारत आणि यजमान दक्षिण अफ्रीका यांच्यामध्ये सेंच्युरियन मैदानात सुरु असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकासमोर भारतीय संघानं विजयासाठी 305 धावांचे आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकाने चार गड्यांच्या मोबदल्यात 94 धावा केल्या आहेत. गुरुवारी कसोटीचा अखेरचा दिवस आहे. भारताला विजयासाठी अद्याप सहा विकेट्सची गरज आहे तर दक्षिण आफ्रिका संघाला 211 धावांची आवश्यकता आहे. अद्याप 90 षटकांचा खेळ बाकी आहे. अशात पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल निश्चित मानला जात आहे. पण दक्षिण आफ्रिका 305 धावांचं आव्हान पार करेल का? की पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने करेल. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. 


दक्षिण आफ्रिका इतिहास रचणार?
दक्षिण आफ्रिका संघाने मायदेशात खेळताना कसोटीमध्ये चौथ्या डावांत फक्त एकदा 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. 2001-02 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात डरबन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 335 धावांचा पाठलाग करत विजय मिळवला होता. 


सेंच्युरियनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा रन चेज
सेंच्युरियन मैदानात आतापर्यंत कसोटीत 300 धावांचा यशस्वी पाठलाग झालेला नाही. य मैदानावर सर्वात मोठा यशस्वी पाठलाग इंग्लंड संघाने केला होता. 2000 मध्ये इंग्लंड संघाने 251 धावांचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. सेंच्युरियन मैदानात आतापर्यंत 27 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये 21 सामने यजमान संघाने जिंकले आहेत. तर दोन वेळा पाहुण्या संघाला विजय मिळवता आला आहे.  चार सामने अनिर्णित राहिले आहेत.


आतापर्यंत सामन्यात काय झालं?
सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत राहुलचं शतक, अगरवालचं अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवला. 197 धावांवर भारताने आफ्रिकेला सर्वबाद करत सामन्यावरील पकड मजबूत केली. ज्यानंतर 130 धावांची आघाडी घेऊन भारताने दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली. पण भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. केएल राहुलने सुरुवातीला टिकून खेळण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने विकेट जात असल्याने राहुलही 23 धावा करुन बाद झाल. मग पुजारा आणि कोहली खेळ सांभाळत आहेत, असे वाटत होते. पण तेव्हाच आधी पुजारा 16 आणि मग कोहली 18 धावा करुन तंबूत परतले. रहाणेही 20 धावाच करु शकला. ज्यानंतर ऋषभ पंतने अखेरच्या काही षटकात 34 धडाकेबाज धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका त्यांचा दुसरा डाव खेळत असताना भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. आफ्रिकेचे सुरुवातीचे फलंदाज भारताने तंबूत धाडले. पण सलामीवीर आणि कर्णधार डीन एल्गर हा टिकून खेळत असल्याने दिवस अखेर तो नाबाद 52 धावांवर आहे. त्यामुळे आफ्रिकेला कर्णधाराकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अखेरच्या दिवशी त्यांना 211 धावा करायच्या असून भारताला 6 विकेट घेऊन आफ्रिकेला सर्वबाद करायचं आहे.