मुंबई : मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीमध्ये काहीतरी वाद असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात विराटने पत्रकार परिषदेत केलेल्या काही खुलाशानंतर तर काहीतरी वाद असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. विराटच्या मते कोणतीही चर्चा न करता एकदविसीय संघाचं कर्णधारपद त्याच्याकडून रोहितला देण्यात आल्याचं त्याने सांगितलं. तर त्याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने विराटसोबत चर्चा केली होती, असं म्हटलं होतं. त्यामुळे दोन वेगवेगळ्या वक्तव्यानंतर गांगुलीचा विराटसोबत काही वाद आहे का? असेही प्रश्न समोर येऊ लागले. ज्यावर स्वत: सौरव गांगुलीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाला, 'याबाबतचं जेही मत आणि निर्णय आहे तो बीसीसीआय देईल, मी याबद्दल काहीच बोलणार नाही.'   


काय म्हणाला होता विराट?


एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराटकडून रोहितकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराटच्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष होतं. ज्यानंतर विराटने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने बरेच खुलासे केले. यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदिसीय संघाचं कर्णधारपद माझ्याकडून काढून घेताना कोणतीच चर्चा झाली नव्हती. आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाच्या चर्चेबाबत फोन केला असता शेवटच्या पाच मिनिटांत तू वन-डेचा कर्णधार नसशील एवढं कळवण्यात आलं. याशिवाय विराटने टी20 संघाचं कर्णधारपद सोडतानाही बीसीसीआयला कळवलं होतं. तेव्हाही बीसीसीआयने केवळ होकार देत यावर कोणतीच चर्चा केली नव्हती, असंही विराट म्हणाला. तसंच आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय सामने खेळताना विराटला विश्रांती हवी आहे, तसंच त्याच्या मुलीचा वाढदिवस यादरम्यान असल्यानं त्याला सुट्टी हवी आहे. अशा बातम्याही समोर येत होत्या. यावर बोलताना विराटने मी अशी कोणतीच विनंती केली नसून एकदिवसीय संघातून खेळण्यासाठी मी तयार असल्याचं विराट म्हणाला. त्यामुळे विराट आणि बीसीसीआयमध्ये नक्कीच काहीतरी खटकत असल्याची शक्यता अजून दृढ झाली आहे.


बीसीसीआयचं म्हणणं काय?


कर्णधारपदाच्या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराटने टी20 संघाचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं. ज्यानंतर मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार म्हणजे टी20 साठी रोहित आणि वन-डेसाठी विराट असल्यास संघाच्या खेळावर परिणाम होऊल त्यामुळे रोहितकडेच दोन्ही जबाबदाऱ्या दिल्याचं म्हटलं आहे.    


संबधित बातम्या



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live