Sourav Ganguly On Ajinkya Rahane, India vs West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची नुकतीच निवड झाली. चेतेश्वर पुजाराला डच्चू देण्यात आला तर अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयच्या या निर्णयावर सौरव गांगुली हैराण झाला असून त्याने संताप व्यक्त केला आहे. 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. तर 18 महिन्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जवळपास 18 महिन्यानंतर अजिंक्य रहाणे याने संघात पुनरागमन केले होते. कमबॅक टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे प्रभावी कामगिरी केली होती. रहाणेने पहिल्या पहिल्या डावात 89 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 46 धावांचे योगदान दिले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दादा म्हणाला की, 18 महिने संघातून बाहेर असणाऱ्याला एका कसोटीसाठी संघात स्थान मिळते आणि त्यानंतर तुम्ही त्याला उपकर्णधार करता... या निर्णायाच्या मागील विचार समजू शकत नाही. तुमच्याकडे रविंद्र जाडेजाच्या रुपाने जबरदस्त पर्याय होता. तो कसोटी संघाचा महत्वाचा सदस्य आहे. पण 18 महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला उपकर्णधार केले, या निर्णायामुळे मी हैराण झालो आहे.
पुजाराबद्दल काय म्हणाला दादा -
खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या पुजाराला भारतीय संघातून वगळण्यात आलेय. त्यावर सौरव गांगुली म्हणाला की,भविष्यात त्याच्याबाबत तुम्ही विचार करताय की नाही? हे निवड समितीने चेतेश्वर पुजाराला स्पष्ट शब्दात सांगायला हवे. कसोटीमध्ये पुजाराला खेळवणार आहात की युवा खेळाडूंना संधी देणार आहात ? याबाबत निवड समितीने निर्णय घ्यायला हवा. पुजाराला याबाबत स्पष्ट शब्दात सांगायला हवे. संघातून बाहेर करता, पुन्हा निवडता..पुन्हा ड्रॉप करता, पुजारासारख्या खेळाडूबरोबर तुम्ही असे करु शकत नाही, असे दादा म्हणाला.