Vamshi Krishna Smashed Six Sixes In An Over: सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी खेळवली जात आहे. या स्पर्धेत एका स्पर्धकानं आपल्या दमदार फलंदाजीनं सर्वांना चकीत केलं आहे. हा फलंदाज म्हणजे, आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) संघाकडून खेळणारा वामशी कृष्णा (Vamshi Krishna). आंध्र प्रदेशचा फलंदाज वामशी कृष्णानं आपल्या दमदार फलंदाजीनं सर्वांना चकित केलं आहे. या 22 वर्षीय तरुण फलंदाजानं कसोटी क्रिकेट फॉरमॅट स्पर्धेत टी-20 सारखी तुफानी फलंदाजी केली आणि एकाच ओव्हर्समध्ये सलग 6 षटकार ठोकले. 


वामशी कृष्णा स्ट्राईकवर उभा होता, त्याच्या दिशेनं एक-एक बॉल येत होता आणि तो अगदी सहज एक-एक बॉल थेट बाऊंड्री पार टोलावत होता. बीसीसीआयने (BCCI) स्वतः वामशीच्या स्फोटक फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या वामशीच्या तुफान फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे.






आंध्र प्रदेशनं 378 धावा केल्या


अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेश आणि रेल्वे यांच्यात सामना झाला. या सामन्यात सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या आंध्र प्रदेश संघाचा सलामीवीर वामशी कृष्णा यानं रेल्वेचा फिरकी गोलंदाज दमनदीप सिंहच्या एका ओव्हरमध्ये सलग 6 षटकार ठोकले. वामशीनं अवघ्या 64 चेंडूत 110 धावांचं शानदार शतक झळकावलं. त्याच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आंध्र प्रदेश संघानं पहिल्या डावात 378 धावा केल्या. एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारून वामशी कृष्णा रवी शास्त्री (1985), युवराज सिंह (2007) आणि ऋतुराज गायकवाड (2022) यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तर, रेल्वेकडून एसआर कमर आणि एमडी जैस्वाल यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स चटकावल्या.


रेल्वेचीही दमदार खेळी


वायएस राजा रेड्डी एसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात आंध्र प्रदेशला 378 धावांवर गुंडाळल्यानंतर रेल्वेनं फलंदाजीतही ताकद दाखवली. रेल्वेचा सलामीवीर अंश यादवनं गोलंदाजांना पराभूत करत 597 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 268 धावा केल्या.


याशिवाय रवी सिंहनं 311 चेंडूत 17 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीनं 258 धावा केल्या. अंचित यादवनं 219 चेंडूंत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 133 धावांची शतकी खेळी केली. रेल्वेनं पहिल्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 865 धावांचा डोंगर उभारला आणि 487 धावांची आघाडी घेतली. मात्र हा सामना अनिर्णित राहिला.