द ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. द ओव्हल मैदानात पाचवी कसोटी खेळवली जाणार आहे. भारताचा कॅप्टन शुभमन गिल यानं मॅचच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शुभमन गिलनं विविध मुद्यांवर भाष्य केलं. जसप्रीत बुमराह पाचवी कसोटी खेळणार की नाही? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा क्यूरेटरसोबत झालेला वाद याशिवाय भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असेल यावर भाष्य केलं.  शुभमन गिल यानं वॉशिंग्टन सुंदरचं कौतुक देखील केलं. याशिवाय अर्शदीप सिंगला पाचव्या कसोटीसाठी तयार राहण्यास सांगितल्याचं शुभमन गिल म्हणाला. मात्र, शुभमन गिलनं अर्शदीप सिंग खेळणार की नाही हे स्पष्ट केलेलं नाही.  

गंभीर आणि पिच क्यूरेटरच्या वादावर गिल काय म्हणाला?

मंगळवारी द ओव्हल मैदानावर गौतम गंभीर आणि ओव्हलच्या मैदानाचा पिच क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला होता. गिलनं मला तिथं काय घडलं माहिती नाही, पिच क्यूरेटरनं जे काय केलं, ते त्यानं का केलं हे माहिती नाही. आम्ही इथं चार मॅच खेळलो आहोत, आम्हाला कुणी रोखलं आहे. इथं खूप क्रिकेट खेळलं आहे. कॅप्टन आणि कोच यापूर्वी अनेकदा पिचला जवळून पाहतात. हा वाद का निर्माण झाला हे माहिती नाही, असं  शुभमन गिल म्हणाला.  

बुमराह खेळणार की नाही?

पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत शुभमन गिलनं अधिक भाष्य करणं टाळलं. जसप्रीत बुमराहबाबत उद्या निर्णय घेतला जाईल. पिचवर अधिक गवत असल्यानं मॅचच्या वेळी आणि वातावरण पाहून जसप्रीत बुमराहला खेळवायचं की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असं गिल म्हणाला.  

भारताचं गोलंदाजी कॉम्बिनेशन कसं असणार?

एकीकडे जसप्रीत बुमराहला विश्राती दिली जाण्याबाबत चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी पदार्पणाच्या कसोटीत चांगली कामगिरी करण्यात अपयश आलेल्या अंशल कंबोजला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं. गिलनं अर्शदीप सिंगला तयार राहण्यास सांगितलं आहे.  मात्र, पिचची पाहणी केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शुभमन गिल म्हणाला. याशिवाय गिलनं रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर विश्वास दाखवला.