IND vs ENG 3rd Test Dukes ball Causes Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत मोठा वाद पेटला आहे. लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असे काही घडले, ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज खूपच संतापले आणि ते थेट पंचांशी भिडले. खंरतर, हे सर्व चेंडू बदल्यामुळे घडले, ज्याबद्दल या मालिकेत आधीच प्रश्न उपस्थित केले गेले होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेंडू बदलण्यावरून भारतीय कर्णधार आणि बांगलादेशी पंच सैकत शराफुद्दौला यांच्यात हा वाद झाला.

बूम-बूम बुमराहचा कहर...

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अर्ध्या तासात इंग्लंडला 3 मोठे झटके दिले. यामध्ये नवीन चेंडूनेही मोठी भूमिका बजावली, ज्यामुळे चेंडू स्विंग आणि सीम होण्यास मदत होत होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी 80.1 षटकांनंतर हा चेंडू घेण्यात आला. अशा परिस्थितीत, नवीन चेंडू असल्याने तो बराच काळ टिकेल अशी अपेक्षा होती, परंतु चेंडू थोडा खराब झाला, त्यामुळे फक्त 10.3 षटके टाकल्यानंतर तो बदलावा लागला.

लॉर्ड्सवर इंग्लंडच्या डावातील 91 व्या षटकात नेमकं काय घडलं?

झाले असे की, इंग्लंडच्या डावातील 91 व्या षटकात चौथा चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद सिराजने चेंडूच्या आकारात बदल झाल्याबद्दल पंचांकडे तक्रार केली. पंच सैकत शराफुद्दौला यांनी पण चेंडूचा आकार बदलल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत, चेंडू बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नंतर अनेक चेंडूंनी भरलेल्या बॉक्समधून एक चेंडू निवडण्यात आला. परंतु हा चेंडू भारतीय संघाला देताच त्यावर प्रश्न उपस्थित झाले. 

चेंडू बदलताच मैदानावर वाद पेटला... 

कर्णधार गिल थेट पंच शराफुद्दौला यांच्याकडे गेला आणि हा चेंडू देण्यास आक्षेप घेतला. गिलची तक्रार अशी होती की, हा चेंडू 10-11 षटकांचा अजिबात जुना दिसत नव्हता, तर नियमांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की कोणताही चेंडू बदलला जातो, तेव्हा तो मूळ चेंडूइतकाच जुना किंवा जवळजवळ तितकाच जुना चेंडू वापरला जातो.

पण पंचांनी गिलचे म्हणणे फेटाळले आणि भारतीय कर्णधार यावर संतापला. मग त्यानंतर सिराज आणि आकाश दीपनेही त्यावर प्रश्न उपस्थित केले. सिराजही पंचांकडे गेला आणि म्हणू लागला की हा चेंडू 10 षटकांचा अजिबात जुना दिसत नाही, परंतु पंचांनी त्याला गोलंदाजीसाठी परत येण्यास सांगितले.