Rishabh Pant Injury Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, टीम इंडियाला पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. उपकर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मैदानावर जखमी झाला आणि त्याला अर्ध्यावर मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला पर्यायी खेळाडू म्हणून यष्टीरक्षक म्हणून बोलावण्यात आले. पण, आता हा प्रश्न चर्चेत आहे की ध्रुव जुरेल पंतच्या जागी फलंदाजी करू शकेल का?

पंतला दुखापत कशी झाली?

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी, इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना 34 व्या षटकात, जसप्रीत बुमराहचा वाइड बाउन्सर पकडण्याचा प्रयत्न करत असताना, चेंडू पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला लागला. फिजिओ मैदानावर आले आणि प्राथमिक उपचारानंतर पंत काही काळ खेळत राहिला, परंतु वेदना वाढल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा विकेटकीपिंगसाठी येऊ शकला नाही.

पंत बाहेर गेल्यानंतर, यष्टीरक्षकाची जबाबदारी तरुण खेळाडू ध्रुव जुरेलकडे सोपवण्यात आली. तो हातमोजे घालून पंतच्या जागी मैदानात आला. यष्टीरक्षकाच्या मागे, त्याने 50 व्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर इंग्लिश फलंदाज ऑली पोपचा शानदार झेल घेऊन भारताला मोठे यश मिळवून दिले.

ध्रुव जुरेल फलंदाजी करणार? काय सांगतो ICC चा नियम....

सर्वात मोठा प्रश्न असा आहे की बदली खेळाडू म्हणून आलेला ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? उत्तर नाही आहे. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या नियम 24.1.2 नुसार, "कोणताही बदली खेळाडू गोलंदाजी करू शकत नाही किंवा कर्णधारही नाही. त्याला पंचांच्या परवानगीनेच विकेटकीपिंग करण्याची परवानगी दिली जाऊ शकते."

या नियमानुसार, ध्रुव जुरेल फक्त विकेटकीपिंग करू शकतो, परंतु फलंदाजी करू शकत नाही. जर पंत या कसोटी सामन्याच्या उर्वरित काळात मैदानात परतला नाही, तर टीम इंडियाला एक फलंदाज कमी घेऊन सामना खेळावा लागेल.

फक्त एकाच परिस्थितीत बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी आहे आणि ती म्हणजे कन्कशन सब्सिटिच्यूट, म्हणजेच जर खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली. पंतच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर या परिस्थितीत हा नियम लागू होत नाही.

बीसीसीआयने काय म्हटले

पंतच्या दुखापतीनंतर बीसीसीआयकडून एक अधिकृत अपडेट देखील आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, "टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे."

हे ही वाचा -

Radhika Yadav News : देश हादरला! टेनिसपटू राधिका यादवची निर्घृण हत्या, रील बनवण्याचा नाद जीवावर, नाराज वडिलांनी तीन गोळ्या झाडून संपवलं