Shubhman Gill Record : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) शानदार शतक झळकावलं आहे. त्याने 54 चेंडूत शतक पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि एक द्वीशतक ठोकल्यावर आता टी20 मालिकेतही त्याने एक शतक पूर्ण केलं आहे. आजचा हा टी20 सामना मालिकेतील तिसरा निर्णायक सामना आहे. सामना जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे. त्यात अशा महत्त्वाच्या सामन्यात शतक झळकावत शुभमननं कमाल कामगिरी केली आहे. सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium, Indore) खेळवला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
विशेष म्हणजे या शतकासह शुभमन तिन्ही क्रिकेट फॉर्माटमध्ये भारतासाठी शतक ठोकणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विराजमान झाला आहे. आशिया कपमध्ये विराट कोहलीनं शतक ठोकल्यावर त्याने या पंगतीत स्थान मिळवलं होतं. ज्यानंतर आता शुभमन गिलनंही या क्लबमध्ये जागा मिळवली आहे.
भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे
- सुरेश रैना
- रोहित शर्मा
- केएल राहुल
- विराट कोहली
- शुभमन गिल
न्यूझीलंडसमोर भारतानं ठेवलं 235 धावाचं आव्हान
सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठी धावसंख्या उभी राहत असल्यानं भारतानं हा निर्णय घेतला आणि सलामीवीर शुभमनच्या तुफान फॉर्मच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली देखील. भारतानं 20 षटकांत 4 गडी गमावत 234 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यावेळी सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन बाद झाला. मग गिलसोबत राहुल त्रिपाठीनं स्फोटक खेळी केली. 44 धावा करुन राहुल तंबूत परतला. मग सूर्यकुमारही 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कॅप्टन पांड्यानं गिलसोबत डाव सावरला. गिलनं तुफान फटकेबाजी करत 54 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 126 धावा केल्या. पांड्यानं 30 तर हुडानं 2 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळे आता न्यूझीलंडला 120 चेंडूत 235 धावा विजयासाठी करायच्या आहेत.
हे देखील वाचा-