Shubhman Gill Century : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलच्या (Shubhman Gill) बॅटमधून आणखी एक शतक पाहायला मिळालं आहे. त्याने वन-डे, टी20 नंतर या वर्षातील पहिलंच कसोटी शतकही झळकावलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात आणखी एक शानदार खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. यासह तो कांगारू संघाविरुद्ध सलामीवीर फलंदाज म्हणून शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.


शुभमन गिल या वर्षात आतापर्यंत फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने द्विशतक झळकावले, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्याने पहिले शतक झळकावलं. आता दुसरे शतकही कसोटी फॉरमॅटमध्ये गिलच्या बॅटने झळकावलं आहे. गिलने या वर्षात आतापर्यंत एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजाचा विक्रम लोकेश राहुलच्या नावावर आहे, ज्याने 2015 मध्ये सिडनी कसोटी सामन्यादरम्यान वयाच्या 22 वर्षे आणि 263 दिवसांत शतक झळकावले होते. दुसरीकडे, शुभमन गिलने वयाच्या 23 वर्षे 184 दिवसांत हा पराक्रम केला आहे. 2021 मध्ये गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावण्याची संधी मिळाली असली तरी तो 91 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


चेतेश्वर पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी केली शतकी भागीदारी 


अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशीच्या खेळाबद्दल बोलताना शुभमन गिलने एका टोकापासून संघाला सातत्य राखताना कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली, तर गिलसह चेतेश्वर पुजाराने 74 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या विकेटसाठी विकेटसाठी 113 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणण्याचं काम शुभमननं केलं. पण पुढे जाऊन 128 धावांवर तो लायनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. शुभमननं आपल्या खेळीत 235 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकत 128 धावा केल्या.


कोहली-अश्विनचेही खास रेकॉर्ड


विराट कोहलीने (Virat KohlI) नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. तसंच अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती.


हे देखील वाचा-