Ind vs Aus 4th Test Match : सलामीचा फलंदाज शुभमन गिलचे (Shubman Gill) दमदार शतक आणि विराट कोहलीची (Virat Kohli) अर्धशतकी खेळी याच्या जोरावर तिसऱ्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गडी गमावत 289 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसअखेर  विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) मैदानात आहेत. विराट कोहलीने 128 चेंडूत 59 धावा आणि रविंद्र जाडेजा 16 धावांवर नाबाद आहे. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 191 धावांनी मागे आहे.नॅथन लायन, मॅथ्यू कुनहेमन आणि टॉट मर्फी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 


शुभमन गिलची शानदार शतकी खेळी


सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतकी खेळी खेळली. शुभमन गिलने 235 चेंडूत 128 धावांची शानदार खेळी केली. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार लगावले. ऑफस्पिनर नॅथन लियॉनने गिलला बाद केले. शुभमन गिलचे कसोटी कारकिर्दीतील  हे दुसरे शतक असून भारतातील पहिलेच शतक आहे. 


चेतेश्वर पुजाराने 42 धावांचे योगदान दिले. तर कर्णधार रोहित शर्माने 35 धावांची खेळी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. 


कोहलीचे 14 महिन्यांनंतर अर्धशतक


कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. कोहलीने तब्बल 14 महिन्यानंतर अर्धशतकी खेळी साकारली. जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात त्याने याआधी अर्धशतकी खेळी साकारली होती.  


रोहित शर्माने पार केला 17 हजार धावांचा टप्पा


अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात, भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्मा 35 धावांवर बाद झाला. पण, रोहितच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली. डावातील 22वी धाव पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 7वा फलंदाज ठरला आहे. 


रोहित शर्माने 438 सामन्यात 457 डावातील खेळीत ही किमया साधली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने 43 शतकं आणि 91 अर्धशतकं झळकावली आहेत. यामध्ये 48 कसोटी सामन्यातील 82 डावांमध्ये 45.80 च्या सरासरीने 3344 धावा केल्यात. तर, 241 एकदिवसीय सामन्यातील 234 डावांमध्ये 9782 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 48.91 धावांची सरासरी आहे. 148 टी-20 सामन्यात 32.32 च्या सरासरीने 3853 धावा रोहितने केल्या आहेत.