Shreyas Iyer BCCI Ranji Trophy  : बीसीसीआयनं फटकारल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानं यु टर्न घेतला आहे. श्रेयस अय्यर आता रणजी स्पर्धेत (Ranji Trophy 2024) मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशननं (MCA) श्रेयस अय्यर मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळणार असल्याची माहिती दिली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेत खराब फॉर्मनंतर श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला होता. पण अय्यरनं पाठदुखीचं कारण सांगत माघार घेतली होती. पण एनसीएकडून श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला फटकारलं होतं. पण आता त्यानं रणजी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. मुंबईच्या सेमीफायनल सामन्यासाठी अय्यर खेळताना दिसणार आहे. 2 मार्च ते 6 मार्च यादरम्यान मुंबई आणि तामिळनाडू यांच्यादरम्यान सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघात आता श्रेयस अय्यर खेळताना दिसणार आहे.


2 मार्च ते 6 मार्च यादरम्यान मुंबई आणि तामिळनाडू यांच्यामध्ये रणजी स्पर्धेचा उपांत्य सामना रंगणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं एमसीएच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार,  'श्रेयस अय्यर याने मुंबई क्रिकेट असोशिएशनला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं आणि उपांत्य सामन्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी सामन्यात अय्यर खेळताना दिसू शकतो.'


श्रेयस अय्यरच्या निर्णायामुळे झाला वाद - 


भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालं होतं. पण पहिल्या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. अय्यरला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. दोन कसोटीतील चार डावात अय्यर यानं  35, 13, 27 आणि 29 धावा केल्या होत्या. फ्लॉप कामगिरीनंतर अय्यरला ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला होता.  


आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना बीसीसीआयकडून करण्यात आलेली. पण अय्यरनं दुखापतीचं कारण सांगत रणजी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाद निर्माण झाला. जो खेळाडू नॅशनल ड्यूटीवर नाही, त्या प्रत्येकाला रणजी सामन्यात खेळावं लागेल, असा फतवा बीसीसीआयनं काढला. याला श्रेयस अय्यर यानं तिलांजली दिली. त्यानंतर बीसीसीआयनं फटकारलं. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा यानेही आपल्या शैलीत त्यांचा समाचार घेतला. बीसीसीआय आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरनं यू टर्न घेतला. आता त्यानं रणजी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. 


मुंबईचा संघ - 


अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकळ, मुशीर खान, प्रसाद पवार (विकेटकीपर), हार्दिक तोमोरे (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवन कुलकर्णी, रॉयस्टन डायस


आणखी वाचा :


धोनीचा हुकुमी एक्का पुन्हा चमकला, मराठमोळ्या खेळाडूने 11 व्या नंबरवर येऊन शतक ठोकलं!