Shoaib Malik on Retirement : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची (Shoaib malik) ओळख पाकिस्तानचा एक स्टार क्रिकेटर अशी आहे. त्याने संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे. एकंदरीत त्याची कारकीर्द चमकदार आहे. दरम्यान शोएब मलिक 1 फेब्रुवारी, 2023 रोजी 41 वर्षांचा होईल, पण तरी देखील त्याने अद्याप पाकिस्तानी संघात पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. शोएब मलिक बऱ्याच काळापासून संघाचा भाग नाही. या अष्टपैलू खेळाडूने नोव्हेंबर 2021 मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग नाही. त्यानंतर आता परतीच्या प्रश्नावर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
'माझा फिटनेस 25 वर्षांच्या खेळाडूंपेक्षा चांगला'
शोएब मलिकचे असे मत आहे की त्याच्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. तो म्हणाला की, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. मी संघातील सर्वात जुना खेळाडू आहे हे खरे आहे, पण माझा फिटनेस 25 वर्षीय खेळाडूंपेक्षा चांगला आहे. मला पाकिस्तानसाठी आणखी क्रिकेट खेळायचे आहे, माझ्यात अजूनही खेळण्याची भूक आहे. मी सध्या निवृत्तीचा विचार करत नाही, माझे लक्ष पाकिस्तानसाठी पुनरागमन करण्यावर आहे. सध्या शोएब मलिक बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळत आहे.
'माझा सध्या निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही'
शोएब मलिक पुढे बोलताना म्हणाला की, जेव्हा मी क्रिकेटला अलविदा म्हणेन, तेव्हा मी सर्व फॉरमॅट आणि लीग क्रिकेटला अलविदा म्हणेन, पण सध्या माझा असा कोणताही हेतू नाही. तो म्हणाला की, सध्या मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. मी याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे, पण एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटसाठी मी नेहमीच उपलब्ध आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू म्हणाला की, मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी माझं सर्वोत्तम प्रदर्शन देईन. याशिवाय नजम सेठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर संधी नक्कीच येतील, असा विश्वास शोएब मलिकला आहे.
पत्नी सानियानं नुकतीच घेतली निवृत्ती
भारताची स्टार टेनिसपटू आणि शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2016 दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी 2015 मध्ये तिने यूएस ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या होत्या. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2009 ची मिश्र दुहेरी ही जिंकली होती. फ्रेंच ओपनमध्येही तिने भारताचं नाव मोठं केलं आहे. त्यानतर तिने तिच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीत फायनलपर्यंत मजल मारली होती. निवृत्ती घेताना ती भावूक झाली होती.
हे देखील वाचा-