Shane Warne Ball of the Century : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी आज निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेन वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. परंतु, त्याची ओळख एवढीच नाही, तर वॉर्न आपल्या गोलंदाजीने चांगल्या-चांगल्या फलंदाजांना चकमा देत असे. एकदा त्याने असा चेंडू टाकला होता, ज्याची इतिहासात 'बॉल ऑफ द सेंच्युरी' या नावाने नोंद झाली आहे. वॉर्नने टाकलेल्या चेंडूने 90 अंशांत वळण घेऊन फलंदाजाची विकेट घेतली होती. त्याचा व्हिडीओ आजही सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

  
1993 च्या ऍशेस मालिकेदरम्यान शेन वॉर्नने 'बॉल ऑफ द सेंच्युरी' हा चेंडू टाकला होता. वॉर्नने 4 जून 1993 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटीत फलंदाज माईक गॅटिंग याला या चेंडूने बाद केले होते. हा चेंडू 90 अंशाच्या कोनातून फिरला होता. हा चेंडू पाहून सगळेच थक्क झाले होते. या चेंडूने वॉर्नचे आयुष्यच बदलून गेले.






वॉर्नचा तो चेंडू लेग-स्टंपच्या चांगलाच बाहेर गेला होता. तो जास्त बाहेर  जाईल असे वाटत होते. त्यामुळेच गॅटिंगने तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु, तो चेंडू खूप वेगाने वळला आणि गॅटिंगला चकमा देत त्याच्या ऑफ-स्टंपवर गेला. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. 


'बॉल ऑफ द सेंच्युरी'चा खुलासाही स्वत: शेन वॉर्ननेच बऱ्याच वर्षांनी केला होता. "हा चेंडू आश्चर्यकारक होता. याची मीही कल्पना केली नव्हती. यापुढे परत कधी मला असा चेंडू टाकता येणार नाही. लेग स्पिनर म्हणून नेहमी चांगल्या लेग ब्रेक गोलंदाजीचा विचार केला जातो. मी सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू टाकला होता. परंतु, चेंडू 90 अंशात विचित्र प्रकारे फिरला होता." असा खुलासा वॉर्नने केला होता. 


महत्वाच्या बातम्या