Shame on BCCI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA Vs IND) होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारताच्या 18 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करतानाच रोहित शर्माकडं (Rohit Sharma) एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. दरम्यान, विराट कोहलीला (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर ट्विटरवर शेम ऑन बीसीसीआय ट्रेन्ड सुरू झालाय. 


अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर कोहलीनं भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडलं. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरल्यामुळं कोहली एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदावरून पायउतार होण्याची शक्यताही गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. याचदरम्यान, बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माकडं कर्णधारपद सोपवलंय. बीसीसीआयच्या निर्णयाचे काही चाहत्यांनी स्वागत केलं. तर, काही जणांनी नाराजी व्यक्त केलीय.


विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआय आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली जात आहे. बीसीसीआयनंच विराट कोहलीला कर्णधारपद सोडण्यास सांगितले होतं. यासाठी विराटला 48 तासांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, विराट कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा एकतर्फी निर्णय घेण्यात आला, अशाही बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. सध्या ट्विटवर 'शेम ऑन बीसीसीआय' ट्रेन्ड सुरू झालाय. 


विराट कोहलीनं टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचं जबाबदारी संभाळणार असल्याचं संकेत दिले होते. विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र, आता त्याला एकदिवसीय संघाच्याही कर्णधार बनवण्यात आलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-