T20 WC, India vs Afghanistan: पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर विश्वचषकातील पुढील वाटचाल भारतासाठी अधिक खडतर झाली आहे. भारतीय संघाला उर्वरीत तिन्ही सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावरही भारताचं सेमीफायनलचं तिकीट अवलंबून आहे. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तविरोधात आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील दोन सामन्यात भारातीय फलंदाजांनी फिरकी गोलंदाजापुढे नांगी टाकली होती. अशात अफगाणिस्तान संघात तीन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. दुबईतील मैदानेही फिरकीसाठी पोषक ठरत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ भारतीय संघाला कडवं अवाहन देऊ शकतो. सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादचं विराट कोहली अन् फिटनेसबाबतचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
90 किलोच्या मोहम्मद शहजाद नेहमीचं फिटनेसमुळे ट्रोल होतो. पण शाहजादला याचा फारसा फरक पडत नाही. शहजादने नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत. फिटनेसच्य प्रश्नावर बोलताना शहजाद म्हणाला की, 'हे पाहा, आम्ही फिटनेसही पूर्ण ठेवतो, अन् खातोय पूर्ण.' पाकिस्तानच्या रेफ्युजी कँपमध्ये खेळणारा शहजाद म्हणाला की, ' प्रत्येकजण विराट कोहलीसारखा नाही होऊ शकत. विराट कोहली जितका लांब षटकार मारतो, त्यापेक्षा जास्त लांब मी मारु शकतो. मग विराटसारखी डायट करण्याची गरज काय? '
माझं वजन क्रिकेटच्या आड कधीच आलं नाही.मी 50 षटकं यष्टीरक्षण करु शकतो अन् 50 षटकं फलंदाजीही करु शकतो, हे माझे कोच फिल सिमन्स यांना माहित आहे, असं शहजाद म्हणाला. शहजाद याने टी-20 सामन्यात अफगाणिस्तान संघासाठी सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यातही मोहम्मद नबी याच्या पाठीमागे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आज अफगानिस्तान जिंकला तर काय?
आजचा सामना जर अफगाणिस्ताननं जिंकला तर टीम इंडिया सरळ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. जर अफगाणिस्ताननं सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ देखील अडचणीत येणार आहे. आज सामना जिंकल्यास अफगाणिस्तानचे 4 सामन्यात 6 गुण होतील. अशात न्यूझीलंडला पुढील सर्व सामने जिंकणं अनिवार्य असेल. हे सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील कारण अफगाणिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा खूप जास्त आहे.
भारत जिंकला तर काय
भारताला आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकावाच लागेल. सोबतच पुढील दोन सामन्यातही भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तर, पाकिस्तानच्या संघालाही स्कॉटलँड आणि नामीबियाविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. यापैकी एकाही सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर, भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
न्यूझीलंडची गणितंही रनरेटवर आधारीत
न्यूझीलंडने अफगाणिस्तानच्या संघाला कमी फरकाने पराभूत करणे आवश्यक आहे. तर, नामिबिया आणि स्कॉटलँडच्या संघाला न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. हे सर्व निकाल भारताच्या बाजूने लागल्यास न्यूझीलंड आणि भारताचे 6 गुण होतील. या दोन्ही संघापैकी ज्यांचा रनरेट चांगला आहे, त्यांना उपांत्य फेरी गाठता येणार आहे. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीच्या ब गटातील गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या, नामिबिया चौथ्या, भारत पाचव्या आणि स्कॉडलँड सहाव्या क्रमांकावर आहे.