T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त सात दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील रोमांच पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये चांगली उस्तुकता पाहायला मिळत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी क्रिकेट तज्ज्ञांनी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afrid) वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाला पूर्णपणे बाजूला केलं होतं, असं त्यानं म्हटलंय.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीनं एका मुलाखतीत असं म्हटलंय की, "भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वामुळं भारतीय संघाचा दृष्टीकोन बदलला आहे. धोनीनं भारत आणि पाकिस्तानमधील वाद पूर्णपणे संपवला होता." पुढं शाहिद आफ्रिदी असंही म्हणाला की, धोनीच्या नेतृत्वात भारतानं सातत्यानं विजय मिळवण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळं भारतीय संघाच्या विचारसरणीत बदल झाला. भारतानं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेला हरवायला सुरुवात केली. त्यांच्याशीच भारतीय संघ स्पर्धा करू लागला. त्यांनी पाकिस्तानला पूर्णपणे बाजुला ठेवलं होतं. आता गोष्टी बदलत आहेत."


पाकिस्ताननं पहिल्यांदाच भारताला विश्वचषक स्पर्धेत हरवलं
दरम्यान, पाकिस्तानच्या संघानं गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघानं पहिल्यांदाचं भारताला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पराभूत केलं. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं सामना गमावला. यावेळी भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती आहे. आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला भिडणार आहे.  मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याकडं दोन्ही देशांतील प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू- मोहम्मद शामी, श्रेयस अय्यर, दीपक चाहर, रवि बिश्नोई.


टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू- मोहम्मद हारिस, फखर जमां, शाहनवाज दहानी.


हे देखील वाचा-