Road Safety World Series 2: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा हंगाम येत्या 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसतील. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय लीजेंड्सनं (India Legends) विजेतेपद पटकावलं होतं. 


सचिन तेंडुलकरकडं पुन्हा एकदा भारतीय लीजेंड्सचं नेतृत्व
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामात सचिन तेंडुलकरनं इंडिया लीजेंड्स संघाचं कर्णधारपद संभाळलं. या हंगामातही सचिन तेंडुलकरच पुन्हा एकदा भारतीय लीजेंड्स संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत युवराज सिंह, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा हे खेळाडूही असतील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबरपर्यंत सर्व खेळाडू लखनऊमध्ये दाखल होतील. 


कधी, कुठं रंगणार सामने?
या स्पर्धेतील पहिले सात सामने 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान लखनौच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. यानंतर पुढील पाच सामने जोधपूरमध्ये (16-19 सप्टेंबर), सहा सामने कटकमध्ये (21-25 सप्टेंबर) आणि त्यानंतर शेवटचे आणि नॉकआऊट सामने हैदराबादमध्ये (27 सप्टेंबर- 2 ऑक्टोबर) खेळवले जातील. 


यंदाच्या हंगामात 'न्यूझीलंड लीजेंड्स'ची एन्ट्री 
पहिल्या सत्रात सात संघ सहभागी झाले होते. यावेळी 'न्यूझीलंड लीजेंड्स' या आणखी एका संघाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आलाय. यावेळी इंडिया लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्ससह एकूण आठ संघ या हंगामात दम दाखवतील. 


पहिल्या हंगामात भारताची दमदार कामगिरी
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामात भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजनं उपांत्य फेरी गाठलीय. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेचा यांच्यात रायपूरमध्ये अंतिम सामना रंगला. श्रीलंकाविरुद्ध अंतिम सामन्यात युसूफ पठाणनं दमदार फलंदाजी केली. या सामन्यात त्यानं 36 चेंडूत 62 धावा केल्या. तर, युवराज सिंहनं 41 चेंडूत 60 धावा केल्या. श्रीलंकेकडून सनथ जयसूर्या आणि चिन्थाका जयसिंघे यांनी चांगली फलंदाजी केली. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. हा सामना भारतानं 14 धावांनी जिंकला.


हे देखील वाचा-