Sachin Tendulkar 50th Birthday : महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टरने आयुष्यातील 'हाफ सेंचुरी' पूर्ण केली आहे. सचिनच्या या प्रवासात त्याला पत्नी अंजलीने साथ दिली. सचिनच्या क्रिकेटमधील प्रवासाप्रमाणेच त्याचा प्रेमाचा प्रवासही फार रंजक आहे. सचिनने 1995 साली अंजलीसोबत लग्न केलं. या दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती. विमानतळावर झालेल्या पहिल्या भेटीतच सचिनच अंजलीवर प्रेम जडलं होतं. या दोघांची प्रेमकहाणी फिल्मी लव्हस्टोरीप्रमाणे आहे.
अशी झाले सचिन आणि अंजलीची पहिली भेट
सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. अंजली आणि सचिन यांच्या वयात बरंच अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे पण, याचा त्यांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही. सचिन आणि अंजली पहिल्यांदाच विमानतळावर एकमेकांना भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीत दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही तर फक्त नजरा नजर झाली. अंजलीच्या कॉमन फ्रेंडने तिला सचिन क्रिकेटर असल्याचं सांगितलं.
सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतताना घडलं असं...
सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतत असताना विमानतळावर अंजलीला पहिल्यांदा भेटला. ही भेट तशी भेट नव्हती, कारण दोघांमध्ये काहीही संवाद झाला नाही. अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. या नजरा-नजरीच्या पहिल्या भेटीनंतर दोघेही एका पार्टीत एकमेकांना भेटले. या पार्टीत दोघांचं पहिल्यांदा बोलणं झालं.
हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात
अंजली अभ्यासात फार हुशार होती आणि मेडिकलची विद्यार्थिनी होती. त्यामुळेच तिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, सचिनला भेटल्यानंतर अंजलीचा क्रिकेटमधील रस वाढला आणि तिने या खेळाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. दोघांची मैत्री वाढली. यानंतर हळुहळु दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि अखेर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केलं.
अंजली पत्रकार बनून गेली सचिनच्या घरी
या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस खुलतं होतं. जेव्हा सचिनच्या घरी याबद्दल सांगण्याची वेळ आली. तेव्हाचा किस्सा फारच रंजक आहे. सचिनला अंजलीला घरच्यांना भेटवायचं होतं, पण प्रेम आहे हे सांगायचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला सचिनने यासाठी कल्पना शोधली. त्यानं अंजलीला पत्रकार बनवून घरी नेलं. यावेळी अंजली कुर्ता-चुडीदार घालून सचिनच्या घरी पोहोचली होती.
सचिनच्या प्रसिद्धीमुळे दोघांना बाहेर फिरणं अवघड
सचिनचे चाहते दिवसेंदिवस वाढत होते, तर दुसरीकडे त्याचं आणि अंजलीचं प्रेम. सचिनच्या प्रसिद्धीनपळे दोघांनाही बाहेर फिरणं अवघड झालं होतं. अंजलीने एका कार्यक्रमात बोलताना याबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. अंजलीने यावेळी सांगितलं होतं की, सचिन एकदा वेश बदलू तिच्यासोबत चित्रपटा पाहायला गेला होता. मात्र, चाहत्यांनी सचिनला ओळखलं आणि दोघांनाही चित्रपट पाहणं अर्धवट सोडूनच तेथून पळ काढावा लागला होता.