आज टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. सचिन 48 आज वर्षांचा झाला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिनला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सहकारी क्रिकेटर्ससह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने सचिनला वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. युवराजने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सचिनसोबतचा वृत्तपत्रातील एक फोटो दाखवत आहे. या व्हिडिओची सुरुवात सचिनच्या बालपणीच्या फोटोपासून झाली आहे. यात सचिनच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातले फोटो दाखवले आहेत. यानंतर अनेक प्रसंगी युवराज सचिनसोबत दिसला आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या विजयाचे अविस्मरणीय क्षणही पहायला मिळत आहेत.
सचिनच्या अविस्मरणीय खेळीचा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयच्या शुभेच्छा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सचिनच्या कारकीर्दीतील रिकॉर्ड शेअर केले आहेत. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सचिनच्या 200 धावांच्या डावाची व्हिडिओ क्लिप बीसीसीआयनेही शेअर केली आहे, ज्यात सचिन त्याच्या फुल फॉर्मात दिसत आहे.
सचिनच्या नावावर 100 शतकं
सचिनने तब्बल 24 वर्षांच्या कारकीर्दीत 782 वेळा फलंदाजी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांत 34 हजाराहून अधिक धावा केल्या, 100 शतके आणि दिडशेहून अधिक अर्धशतके केली आहेत. सचिन आपल्या कारकीर्दीत वर्षाच्या जवळपास प्रत्येक दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असे. त्याने दोनशेहून अधिक बळीही घेतले.