SA vs NZ Report: पुण्यातील विश्वचषकाच्या (World Cup 2023) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा (SA vs NZ) तब्बल 190 धावांनी दारुण पराभव केला. आफ्रिकेने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी फलंदाजांची दमछाक उडाली. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव 35.3 षटकात 167 धावांत संपुष्टात आलाय. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने एकाकी झुंज दिली. त्याने 50 चेंडूत 60 धावांची खेळी केली. फिलिप्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.


डेवेन कॉनवे 2, विल यंग 33, रचिन रविंद्र 9, डॅरेल मिचेल 24, टॉम लेथम 4, मिचेल शँटनर 7, टीम साऊदी 7, जीमी नीशम 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्को यानसन याने 3 विकेट घेतल्या. त्याशिवाय Gerald Coetzee याने दोन विकेट घेतल्या. तर रबाडाला एक विकेट मिळाली.


डिकॉकचे चौथे शतक, आफ्रिका पुन्हा 350 पार - 


पुण्याच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 357 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ झाली. त्यात कर्णधार टेंबा बावूमा 24 धावा काढून तंबूत परतला. पण त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि रासी वान डुर डुसैन याने मोठी भागिदारी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 200 धावाचं भागादारी झाली. सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक याने पुन्हा एकदा शतकी धमाका केला. क्विंटन डि कॉकने 116 चेंडूत 114 धावांची खेळी केली. या डावत त्याने 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले. डिकॉकचे विश्वचषकातील हे चौथे शतक होय. त्याशिवाय रासी वान डुर डुसैन यानेही शतक ठोकले.  डुर डुसैन याने 118 चेंडूत 133 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 5 षटकार ठोकले.  अखेरच्या षटकात डेविड मिलर याने वादळी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. मिलरने 30 चेंडूत 53 धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. क्विंटन डि कॉक याने विश्वचषकात चार शतके ठोकली आहेत. तर डुसेन याने दोन शतके ठोकली आहे. यंदाच्या विश्वचषकात डिकॉकने 500 धावांचा पल्ला पार केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपणारा डिकॉक पहिला फलंदाज आहे. डिकॉकने सात सामन्यात 545 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक विकेट घेतल्या. 10 षटकात त्याने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि जीमी नीशम याने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.