Rohit Sharma, World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा पराभव करत भारतीय संघ आता पुण्यात दाखल झाला आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या निशाण्यावर काही विक्रम आहेत. टीम इंडियासोबत रोहित शर्माही तुफान फॉर्मात आहे. भारतीय संघ तीन विजयासह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. 36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषकाच्या तीन डावात एक शतक आणि एका अर्धशतकासह 72 च्या सरासरीने 217  धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्याच नावावर आहेत. विश्वचषकात रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत आहे. पुण्यातही रोहित शर्मा रौद्ररुप धारण करेल, असा अंदाज आहे. पुण्याच्या मैदानात रोहित शर्माच्या निशाण्यावर काही रेकॉर्ड्स आहेत. कपिल देव आणि धोनीचा विक्रम रोहित मोडण्याची शक्यता आहे. 


धोनीच्या विक्रमापासून फक्त 25 धावा दूर


पुण्यामध्ये रोहित शर्मा 25 धावांची खेळी करताच धोनीचा विक्रम मोडणार आहे. कर्णधार असताना धोनीने 2011 च्या विश्वचषकात 241 धावा केल्या आहेत. तर 2015 मध्ये धोनीच्या बॅटमधून 237 धावा चोपल्या आहेत.  आता गुरुवारी रोहित शर्माने 25 धावा केल्यास धोनीचा विक्रम मोडला जाणार आहे. 


कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी किती धावा ?


कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात 303 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने हा विश्वचषक जिंकला होता. कपिल यांनी या विश्वचषकात 303 धावा केल्या होत्या. रोहित शर्माला कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी 87 धावांची गरज आहे. 


कपिल देव आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माकडे साखळी फेरतील अद्याप सहा सामने शिल्लक आहेत. रोहित शर्मा आरामात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 


रोहितची नजर पहिल्या स्थानावर ?


वनडे वर्ल्ड कपच्या एका हंगामात कर्णधार असताना सर्वाधिक धावांचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात सौरव गांगुलीने तीन शतकांच्या मदतीने 465 धावा चोपल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 च्या विश्वचषकात विराट कोहलीने पाच अर्धशतकाच्या मदतीने 443 धावा केल्या होत्या. सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत विश्वचषकात 400 धावांचा टप्पा पार करता आला नाही. रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.