T20 World Cup 2024 :  रोहित शर्माच्या भारतीय संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूयॉर्कमधल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा आठ विकेट्स आणि 46 चेंडू राखून धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडचा डाव दहा षटकांत 96 धावांत गुंडाळला. त्यानंतर भारतानं विजयासाठीचं 97 धावांचं आव्हान केवळ दोन विकेट्स गमावून  गाठलं. रोहित शर्मानं सलामीला 52 धावांची खेळी करून भारतीय डावाचा पाया रचला. त्यानं 37 चेंडूंमधली खेळी चार चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. रोहित शर्मा अर्धशतकानंतर रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. रोहित शर्माचा हात दुखत होता, त्यामुळे तो माघारी परतला. पण या खेळीमध्ये रोहित शर्माने अनेक विक्रम केले. 

टी20 विश्वचषकात 1000 धावा 

आयर्लंडविरोधात 37 धावा करताच रोहित शर्माने टी20 विश्वचषकात एक हजार धावांचा टप्पा पार केला. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा तिसरा खेळाडू ठरलाय. याआधी विराट कोहली आणि श्रीलंकेच्या महेला जयवर्धने यांनी एक हजार धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहलीच्या नावावर  1142 धावा आहेत, तर जयवर्धने याच्या नावावर 1016 धावा आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी20 विश्वचषकात रोहित शर्माने 37 डावात 128.48 च्या स्ट्राइक रेटने 1015 धावा केल्या आहेत.  

टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा

खेळाडू सामना  धावा स्ट्राइक रेट 100s 50s
विराट कोहली 28 1142 130.66 0 14
महेला जयवर्धने 31 1016 134.74 1 6
रोहित शर्मा 40 1015 128.48 0 10
ख्रिस गेल 33 965 142.75 2 7

4000 हजार धावांचा पल्ला - 

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने चार हजार धावांचा पल्ला पार केलाय. टी20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा पल्ला पार कऱणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी विराट कोहलीने हा पराक्रम केलाय. विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 4038 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा 4026 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हिटमॅनचे 600 षटकार -

टी20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक ठोकले. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 600 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. गेलने कसोटी, वनडे आणि टी20 मध्ये मिळून 553 षटकार ठोकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर शाहिद आफ्रिदी आहे, त्याने 476 षटकार ठोकले आहेत.  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर ? 

खेळाडू सामना षटकार
रोहित शर्मा 472 600
ख्रिस गेल 483 553
शाहिद आफ्रिदी 524 476
ब्रँडन मॅक्युलम 432 398
मार्टिन गुप्टिल 367 383