Team India Announced :  निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची बुधवारी सायंकाळी घोषणा केली. त्यासोबत भारतीय एकदिवसीय संघाच्या नवीन कर्णधाराचीही घोषणा केली. एकदिवसीय कर्णधारपद आणि कसोटीचं उपकर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. एकप्रकारे निवड समितीने विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना धक्का दिला आहे. निवड समितीने भारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून विराट कोहलीला तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन अजिंक्य रहाणेला मुक्त करण्यात आलं आहे. 


न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून रोहित हा भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार आहे. पण आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानिमित्तानं भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही रोहितच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं आगामी काळात रोहित शर्मावर तिहेरी जबाबदारी पाहायला मिळेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात अजिंक्य रहाणेला कायम ठेवण्यात आलं आहे. पण उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. 


यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीनं टी-20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, टी-20 आणि एकदिवसीय संघाचा एकच कर्णधार असावा. त्यामुळे रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.  2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, त्याच्या तयारीसाठीही रोहितला पुरेसा वेळ मिळेल. 2017 मध्ये विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या एकदिवसीय संघाची धुरा सोपण्यात आली होती. 2019 च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी धोनीनंतर लगेच विराटकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता.   


विराट कोहलीने 95 सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाचा 65 सामन्यात विजय झालाय तर 27 सामन्यात पराभवाचा सामना करावा लगाला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय एकदिवसीय संघाची विजयाची टक्केवारी 72.65 टक्के इतकी आहे. कर्णधार असताना विराट कोहलीने  पाच हजार 449 धावांचा पाऊस पाडलाय. 






गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य रहाणेची फलंदाजीही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरली होती. वर्षभरात रहाणेलाही एकही शतक ठोकला आलं नव्हतं. विराट कोहलीला मागील दोन वर्षांपासून आपल्या लौलिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. वर्कलोडचं कारण देत विराट कोहलीनं टी-20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आता त्याच्याकडून एकदिवसीय संघाचं कर्णदारपदही काढून घेतलं आहे.