Rohit Sharma Ranji Trophy: भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईकडून रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. काही काळापासून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा रणजी क्रिकेटकडे (Rohit Sharma Ranji Trophy Mumbai Match) पुन्हा वळला. सध्या मुंबई आणि जम्मू-काश्मीरच्या संघांमध्ये मुंबईतील बीकेसी मैदानात रणजी सामना सुरु आहे. मात्र 10 वर्षांनी रणजी क्रिकेटमध्ये उतरलेल्या रोहित शर्माला पहिल्या डावात मोठी धावसंख्या करता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. जम्मू-काश्मीरच्या साडेसहा फुटी उमर नझीरने रोहित शर्माला झेलबाद केला. मात्र दुसऱ्या डावात रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे. पहिल्या डावात बाद करणाऱ्या उमर नझीरला धू धू धुतला. उमर नझीरच्या एका षटकात रोहित शर्माने एक षटकारसह दोन चौकार झळकावले.
मुंबईचा पहिला डाव 120 धावांवर गुंडाळला-
जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी केली, त्याने 57 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या आणि तो या संघाचा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाजही ठरला. याशिवाय, तनुष कोटियनने शेवटच्या क्षणी 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि त्याच्या फलंदाजीमुळे मुंबईची धावसंख्या 120 धावांपर्यंत पोहोचली.
जम्मू-काश्मीरच्या पहिल्या डावात 206 धावा-
मुंबईच्या आग्रमक गोलंदाजीविरुद्ध जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा केल्या. जम्मू-काश्मीरकडून शुभम खाजुरीयाने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर अबिद मुश्ताकने 44 धावा झळकावल्या. मुंबईकडून मोहित अवस्थीने सर्वाधिक 5 विकेट्स पटकावल्या. तर शार्दुल ठाकूर आणि शाम्स मुलानी याने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात उमर नझीर आणि युद्धवीर सिंग जोडीचा कहर!
मुंबईविरुद्धच्या पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरचा 6 फूट 4 इंचाचा वेगवान गोलंदाज उमर नझीरने 11 षटकांत 41 धावा देत 4 खेळाडूंची शिकार केली. तर युद्धवीर सिंगने 8.2 षटकांत 31 धावा देत 4 विकेट घेतल्या. पहिल्या डावात आकिब नाबिदारला 2 यश मिळाले. उमर नझीरने रोहित, हार्दिक, रहाणे आणि शिवम यांचे बळी घेतले तर युद्धवीरने श्रेयस, शम्स मुलानी, शार्दुल आणि मोहित अवस्थीला आऊट केले. पहिल्या डावात आकिबने यशस्वी जैस्वाल आणि तनुश कोटियन यांना बाद केले.