न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2024) उद्या हाय व्होल्टेज लढतीत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने येणार आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी रोहितनं विविध प्रश्नांची उत्तरं दिली. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील पिच संदर्भात विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संदर्भात विचारलं असता रोहित शर्मानं खेळपट्टी कशीही असली तरी चांगलं क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं असतं, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


रोहित शर्मा काय म्हणाला?


चांगलं क्रिकेट खेळणं महत्त्वाचं असतं, तुमच्या विरोधात कोण आहे किंवा खेळपट्टी कशी आहे यापेक्षा तुमची कामगिरी चांगली असणं महत्त्वाचं असतं, असं रोहित शर्मा म्हणाला. फलंदाजांनी किंवा गोलंदाजांनी तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं रोहित म्हणाला. आमच्याकडे अनेक अनुभवी खेळाडू आहेत. आम्ही पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे खेळलो, त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असल्याचं त्यानं सांगितलं. 


माझा प्रयत्न एका दोघांवर मॅच जिंकण्यासाठी अवलंबून राहण्याचा प्रयत्न कधीच नसतो. संघातील सर्वांनी चांगली कामगिरी करण्याची गरज असते. विराट कोहलीनं पुरेसा सराव केला आहे. विराट कोहलीकडे मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळताना दबाव असतो काय संदर्भात प्रश्न विचारला गेला असता रोहित शर्मानं या प्रश्नाचं उत्तर देखील दिलं. पाकिस्तान विरुद्ध खेळताना काही बदलत नाही. आम्ही सात महिन्यांपूर्वी आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यांचा सामना केला आहे, असं रोहितनं म्हटलं. 


तुम्ही तुमच्या देशासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळता हे महत्त्वाचं असतं, असं रोहित शर्मानं म्हटलं. रिषभ पंतला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्याचा विचार कसा समोर आला याबाबत देखील त्यानं भाष्य केलं. आयपीएलमध्ये रिषभ पंत तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करत असल्याचं पाहत होतो. तेव्हाच रिषभला कुठल्या स्थानावर संधी द्यायची हे ठरलं होतं.  रिषभ पंतचा पलटवार करण्याचा गुण फायदेशीर ठरु शकतं, असं वाटलं. त्यामुळं या प्रयत्नात यशस्वी जयस्वालला संघाबाहेर बसावं लागलं, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


रिषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर कशी संधी मिळाली?


मधल्या फळीत दबाव न घेता खेळणाऱ्या फलंदाजाची गरज होती. रिषभ पंत गेल्या पाच सहा वर्षांपासून खेळतोय. सलामीवीरांशिवाय इतरांच्या फलंदाजीच्या जागा निश्चित नाहीत, असं रोहित शर्मा म्हणाल्या. तिसऱ्या स्थानापासून सातव्या स्थानापर्यंत कुणाच्या जागा निश्चित नाहीत, असं रोहित शर्मा म्हणाला. वनडे वर्ल्ड कप प्रमाणं आक्रमक सुरुवात करणार की धोरण बदलणार असं विचारलं असता रोहित शर्मानं खूप आक्रमक किंवा खूप सावध फलंदाजी करणार नाही, असं रोहित शर्मा म्हणाला. आम्ही आठ फलंदाजांसह खेळणार असल्याचंही रोहित शर्मा म्हणाला. 


झिम्बॉब्वेकडून पराभव होऊनही पाकिस्ताननं गेल्यावेळी फायनल खेळली होती. टी-20 क्रिकेटमध्ये त्या दिवशी काय घडतंय हे महत्त्वाचं आहे. पाकिस्तानचा देखील गेल्या मॅचमधील चुका टाळण्याचा प्रयत्न असेल, असं रोहितनं म्हटलं. सर्व खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतील, आम्हाला संघ म्हणून काय करायचं आहे, यावर सगळे लक्ष देतील, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


संबंधित बातम्या :


IND vs PAK : कोहली नको यशस्वी जयस्वालला रोहितसोबत सलामीला पाठवा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा महत्त्वाचा सल्ला 


IND vs PAK: भारत पाकिस्तान मॅचचं तिकिट खरंच दीड कोटी रुपयांना मिळतंय? जाणून घ्या नेमकं कारण अन् सत्य