बर्मिंगहॅम : टीम इंडियाच्या बांगलादेशवरच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मानं त्या सामन्यानंतर एका भारतीय चाहतीची आवर्जून भेट घेतली. या तरुण चाहतीचं नाव मीना आहे. रोहितनं आपल्या शतकादरम्यान मारलेल्या एका षटकारानं मीनाला दुखापत झाली होती.


त्यामुळं सामना संपल्यानंतर भारताच्या उपकर्णधारानं मीनाची भेट घेऊन तिची आस्थेनं चौकशी केली. रोहितनं मग तिला ऑटोग्राफ करून एक कॅपही भेट दिली. त्यामुळं मीनाची कळी भलतीच खुलली.


विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताच्या सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. 92 चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. या खेळीत रोहित शर्माने मारलेला एक षटकार प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या मीनाला लागल्याने तिला दुखापत झाली.

रोहित शर्माने सामन्यानंतर त्या तरूणीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी रोहित शर्माने तिला एक खास भेट दिली. रोहित शर्माने मीनाला सही केलेली कॅप भेट दिली. रोहितच्या या अनोख्या भेटवस्तूमुळे मीनाचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसून येत होता.



दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघांमधल्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मानं कालचा विजय 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांच्या बरोबर साजरा केला आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनवर कालच्या सामन्यादरम्यान 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांची उपस्थिती सर्वात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मानं सामना संपल्यानंतर चारुलताबेन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलताबेन यांनी विराट आणि रोहितला आजीच्या ममतेनं कुरवाळत दोघांचा लाडानं मुकाही घेतला. मग विराटनं चारुलता पटेल यांचा खास उल्लेख करुन, त्यांच्यासोबतचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


टीम इंडियाने  बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली बुमराहने घेतलेल्या चार, तर हार्दिक पंड्याने घेतलेल्या तीन विकेट्सच्या बळावर भारताने बांगलादेशला रोखलं.  बर्मिंगहॅमच्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने 50 षटकांत नऊ बाद 314 धावांची मजल मारली होती. त्याला उत्तर देताना बांगलादेशचा डाव 48 व्या षटकातच सर्वबाद 286 धावांवर आटोपला.