India vs Australia 1st Test BGT 2024-25 : भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मिशन ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर मालिका असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका निराशेने संपवणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात विजयाने करायची आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतात. कर्णधार रोहित शर्मा आणि आर अश्विनला बाहेर ठेवण्याची शक्यता आहे. उपकर्णधार जसप्रीत बुमराह कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
न्यूझीलंडने भारताचा 3-0 असा पराभव करत मालिका खिशात घातली. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला चांगलाच धडा मिळाला. घरच्या मैदानावर झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असणार आहे. गेल्या काही वर्षात भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत चार मालिका जिंकल्या आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्यापैकी दोघे ऑस्ट्रेलियात जिंकल्या. आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे, पण ते इतके सोपे नसेल.
22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरन यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करणारा हा सलामीवीर ऑस्ट्रेलियातही आपला फॉर्म कायम ठेवेल, अशी आशा संघाला आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. पण त्याचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड चांगला आहे. कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि आपला फॉर्म पुन्हा मिळवण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.
केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्फराज खानच्या जागी खेळू शकतो. ऑस्ट्रेलियातील त्याच्या अनुभवामुळे त्याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले जाणार हे निश्चित मानले जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी स्फोटक फॉर्म दाखवणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत महत्त्वाचा मानला जात आहे. 2020-21 मध्ये भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अपघातानंतर पुनरागमन करणाऱ्या पंतने पाच कसोटी सामन्यांमध्ये एक शतक, 99 धावा आणि दोन अर्धशतके केली आहेत.
वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटीत चमकदार कामगिरी केली होती. तो रवींद्र जडेजासह इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल आणि त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि आकाश दीप असतील. अलीकडे सिराज चांगला फॉर्ममध्ये नाही, पण ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव त्याला इलेव्हनमध्ये स्थान मिळवून देऊ शकतो.
भारताची संभाव्य इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार), आकाश दीप.