Rohit Sharma Ind Vs Eng 2nd ODI: कटकमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs England) भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक धावा केल्या केल्या. रोहित शर्माने 90 चेंडूंत 12 चौकार आणि 7 षटकारांचा पाऊस पाडत 119 धावा ठोकल्या. तर शुभमन गिलने 9 चौकार आणि 1 षटकारसह 60 धावा केल्या.
इंग्लंडचा डाव 49.5 षटकांत 305 धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारताने 44.3 षटकांत 6 बाद 308 धावा करत बाजी मारली. शानदार शतक ठोकणारा कर्णधार रोहित सामनावीर ठरला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. रोहित शर्माने शतक झळकावून अनेक महिन्यांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवला. तसेच रोहित शर्माच्या कारकिर्दीतील हे दुसरे सर्वात जलद शतक होते. कटक वनडेमध्ये रोहितने फक्त 76 चेंडूत शतक पूर्ण केले. यापूर्वी, रोहितने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक पूर्ण केले होते.
रोहित शर्माची संपूर्ण खेळी, VIDEO: (Captain Rohit Sharma Century Full Video)
मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. तसेच भारताने इंग्लंडविरुद्ध मालिकाही जिंकली. या विजयानंतर रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला की, संघासाठी धावा काढणे चांगले वाटले. विशेषतः जेव्हा मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर असते, तेव्हा तुम्ही धावा काढता तेव्हा एक छान वाटतं. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तुम्हाला तुमचा फलंदाजीचा पॅटर्न बदलावा लागेल, कारण हा फॉरमॅट टी-20 पेक्षा मोठा आणि कसोटीपेक्षा लहान आहे, असं रोहित शर्माने सांगितले. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, तुम्हाला परिस्थितीनुसार तसेच तुमच्या संघाच्या गरजेनुसार खेळावे लागेल. मला शक्य तितका वेळ क्रीजवर राहायचे होते. रोहित शर्माने इंग्लंडच्या रणनीतीवरही भाष्य केलं. भारतीय कर्णधार म्हणाला की माझ्याविरुद्धची रणनीती म्हणजे शरीरावर गोलंदाजी करणे. पण मी त्यासाठी तयार होतो. मला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची चांगली साथ मिळाली. आम्हाला एकमेकांसोबत फलंदाजी करायला आवडते, तो एक उत्तम फलंदाज आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला.