नवी दिल्ली: भारतानं (Team India) दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत 7 धावांनी पराभूत करत 17 वर्षानंतर विश्वविजेतेपद पटकावलं. भारताला टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांच्या निर्णयानं चाहत्यांना धक्का बसला होता. रोहित शर्मा सध्या विदेश दौऱ्यावर आहे, या दौऱ्यामध्ये त्याला एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात उत्तर देताना रोहित शर्मानं त्याचा पुढचा प्लॅन सांगितला आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी भारत जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळू असं म्हटलं होतं. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळेल, असं जय शाह म्हणाले होते. जय शाह यांनी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसंदर्भात काही भाष्य केलं नव्हतं. दुसरीकडे गौतम गंभीरनं देखील टीममधील वरिष्ठ खेळाडूंसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अखेरची संधी असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता रोहित शर्मानं वनडे आणि कसोटी मालिकेतून निवृत्तीबाबतची अपडेट दिली आहे.
रोहित शर्माला 14 जुलै म्हणजे काल डल्लास मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यातील निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. रोहित शर्मानं म्हटलं की तो खूप पुढचा विचार करत नाही. मात्र, फॅन्स त्याला खूप क्रिकेट खेळताना पाहू शकतात. रोहित शर्मा म्हणाला मी अजून खूप क्रिकेट खेळू शकतो. हिटमॅनच्या या उत्तरावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या.
रोहित शर्माकडून स्वप्नपूर्तीनंतर निवृत्ती
दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करुन भारतानं 17 वर्षानंतर विश्वविजेतेपद मिळवलं होतं. रोहित शर्मा भारताच्या 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. सतरा वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं विजेतेपद मिळवलं. भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. रोहित च्या नेतृत्त्वात भारतीय संघ 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजेतेपद पटकावलं आहे.
संबंधित बातम्या :