Asia Cup 2022: आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया चषकाला सुरु होण्यासाठी फक्त 10 दिवसांचा कालावधी राहिलाय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ आशिया चषकात विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतानं आतापर्यंत सात वेळा आशिया चषक जिंकलंय. यंदा आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. याशिवाय, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माकडं आशिया चषकात मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. आशिया चषकातील वयैक्तिक 1000 धावांचा टप्पा गाठण्यापासून रोहित शर्मा फक्त 117 धावा दूर आहे. 

आशिया चषकात 117 धावा केल्यास रोहित शर्मा या स्पर्धेत 1000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. रोहित शर्मानं आशिया चषकात आतापर्यंत 883 धावा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, आशिया चषकात फक्त दोनच फलंदाजाला 1000 धावांचा टप्पा गाठता आलाय. या स्पर्धेत सर्वात प्रथम श्रीलंकेचा तडाखेबाज फलंदाज सनथ जयसू्र्यानं 1000 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आशिया चषकात 1000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. सनथ जयसूर्या आणि संगकारा यांच्यानंतर कोणत्याही आशियाई फलंदाजाला आशिया चषकात 1000 धावा करता आल्या नाहीत.

रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म
इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकाच्या सामन्यात रोहित शर्मानं दमदार कामगिरी केली. रोहित शर्माला गेल्या एक वर्षात दुखापतीमुळं महत्वाच्या अनेक सामन्याला मुकावं लागलंय. रोहित शर्माचं फॉर्ममध्ये परतणं ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघासाठी फायद्याचं ठरू शकतं. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर रोहित शर्मा वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आतापर्यंत एकही मालिका गमावली नाही. नुकतंच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतान मर्यादीत षटकांच्या मालिकेत इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांच्या मायदेशात धुळ चारली आहे. 

आशिया चषक 2022 वेळापत्रक-

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-