IND vs SL : मोहाली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डाव 574 धावांवर घोषित केला. टीम इंडियाच्या या डावात रविंद्र जाडेजा आणि रिषभ पंत यांचं मोलाचं योगदान होतं. जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला तर पंतने 96 धावांची खेळली रचली. रिषभ पंतने या खेळीदरम्यान एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
मोहालीमध्ये रिषभ पंतने 97 चेंडूंचा सामना करत 96 धावा केल्या. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि चार षटकार लगावले. या षटकारांच्या मदतीने एक खास रेकॉर्ड बनवण्यात पंत यशस्वी ठरला. क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2018 पासून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत रिषभ पंत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याबाबतीत त्याने रोहित शर्मालाही मागे टाकलं.
कसोटी क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2018 नंतर आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत बेन स्टोक्स पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने 43 षटकार लगावले आहेत. तर रिषभ पंत 42 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहितने 34 षटकार ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर रिषभ पंतचा हा खास विक्रम आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडविरोधात पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत त्याने 29 कसोटी सामन्यांमध्ये खेळला आहे. या सामन्यातील 49 डावात त्याने 1831 धावा केल्या. त्याच्या नावावर 4 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तो अनेक वेळा नर्व्हस नाईन्टीचा बळी ठरला आहे.
भारत मजबूत स्थितीत
मोहाली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या दिवशी भारताने दमदार कामगिरी केली आहे. रविंद्र जाडेजच्या पावणे दोनशे धावांच्या खेळीच्या बळावर भारताने लंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. 8 विकेट्सच्या मोबदल्यात भारताने लंकेसमोर 574 धावांचं आव्हान उभं केलं आहे. कर्णधार रोहित शर्माने 574 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला आहे. त्यामुळे आता भारत मजबूत स्थितीत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी रिषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता.