मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला आयसीसीकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी रिषभ पंतला नामांकन मिळालं आहे. या पुरस्कारासाठी रिषभ पंतसोबत इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हे दोघे शर्यतीत आहेत. आयसीसीने पहिल्यांदाच प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन जाहीर केलं आहे. या पुरस्काराद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना संपूर्ण वर्षभर मान्यता मिळेल.
23 वर्षीय रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये 97 धावांची खेळी रचली होती. त्याच्या खेळीमुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश मिळालं होतं. तर ब्रिस्बेन कसोटीत त्याच्या नाबाद 89 धावांच्या खेळीमुळे भारताने विजय मिळवत मालिकाही खिशात टाकली.
तर जो रुटने जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आणि त्यात 228 तसंच 186 धावांची खेळी रचत आपल्या संघाला कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
यामध्ये बेस्ट प्लेयर ऑफ द मंथमध्ये नामांकन मिळालेला तिसार खेळाडू आयर्लंडचा आहे. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने यूएईविरुद्ध दो आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन शतकं बनवली.
रिषभ पंतला पुरस्कार मिळण्याची शक्यता
जो रुटने जानेवारीमध्ये दुहेरी शतक आणि शतक केलं असेल. तसंच पॉल स्टर्लिंगनेही तीन शतकं केली असतील तरी रिषभ पंत आयसीसीकडून पुरस्कार मिळण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. रिषभ पंतने ऑस्ट्रेलियामध्ये उत्तम खेळी रचली आणि सोबतच संघाला विजयही मिळवून दिला. कठीण प्रसंगात रिषभ पंतची खेळी अनेक अर्थाने दुहेरी शतक आणि शतकापेक्षा उजवी ठरते.