AUS vs WI: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट विंडिज यांच्यादरम्यान पर्थमध्ये कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याची प्रकृती अचानक बिघडली. पाँटिंगच्या छातीत दुखू लागल्यामुळे पाँटिंगला रुग्णलयात दाखल करण्यात आले. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुपारी अचानाक पाँटिंगला अस्वस्थ वाटू लागलं. समालोचन करणाऱ्या पाँटिंगच्या अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाँटिंगवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट विंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान चॅनल सेवनसाठी रिकी पाँटिंग समालोचन करत होता.  




कसोटी सामन्याचा तिसरा दिवस -
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट विंडिज यांच्यात पर्थ मैदानात सुरु असलेल्या कसोटीचा आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी वेस्ट विंडिजचा संघ 283 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे विंडिजचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 315 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिाय प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात 598 धावांचा डोंगर उभारला होता. 


लाबुशेन आणि स्मिथची द्वशतकी खेळी
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन आणि स्टीव स्मिथ यांनी द्वशतक झळकावलं. मार्नस लाबुशेन याने 204 धावांची खेळी केली. यामध्ये 20 चौकार आणि एका षटकारांचा समावेश आहे.  स्टीव स्मिथ 200 धावांवर नाबाद राहिला. स्मिथने आपल्या खेळीदरम्यान 16 चौकार लगावले. स्मिथ-लाबुशेन यांनी संयमी फलंदाजी करत वेस्ट विंडिडच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याशिवाय ट्रेविस हेड याने 99 आणि उस्मान ख्वाजा याने 65 धावांची खेळी केली. 


ऑस्ट्रेलियाची दमदार गोलंदाजी-
फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनाही अचूक टप्प्यावर मारा केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर वेस्टविंडिजची फंलदाजी कोलमडली. मिचेल स्टार्कने 51 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्सनेही 34 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. नॅथन लायन याने दोन विकेट घेतल्या. जोश हेजलवूड आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  वेस्ट विंडिजकडून क्रेग ब्रॅथवेट 64 आणि टी चंद्रपॉल 51 यांनी अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय ब्लॅकवूडने 36, शमर ब्रूक्सने 33 आणि जेसन होल्डर याने 27 धावांची खेळी केली.