IPL 2022: भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स राखून विजय मिळवला. यंदाच्या हंगामात अनेक दिग्गज खेळाडू गोल्डन डकचे शिकार ठरले. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचंही नाव आहे. परंतु, पाच डावात तीनवेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू विराट नव्हेतर न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊथी आहे. 

आयपीएलचा पंधरावा हंगाम विराट कोहलीसाठी खूप वाईट गेला. या हंगामात त्यानं तीन वेळा शून्यावर आपली विकेट्स गमावली. कोहली व्यतिरिक्त, कोलकाता नाईट रायडर्सचा टिम साऊथी तीन वेळा शून्यावर बाद झालाय. टीम साऊथी एकमेक असा खेळाडू आहे, जो पाच डावात तीनवेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तो गोलंदाज असला तरी तो चांगली फलंदाजीही करू शकतो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5 अर्धशतकेही झळकावली आहेत.

गोल्डन डकचे शिकार झालेले खेळाडू
आयपीएल 2022 च्या हंगामात एकूण सहा खेळाडू आहेत, जे तीन-तीनवेळा गोल्डन डकचे शिकार ठरले आहेत. या यादीत कोहली, टीम साऊथी यांच्यासह 6 खेळाडूंचा समावेश आहे. यात केएल राहुल, अनूज रावत राशिद खान आणि सुनील नरायण यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

सर्वाधिक वेळा गोल्डन डकचे शिकार ठरलेले फलंदाज-

क्रमांक फलंदाज डाव
1 टीम साऊथी 5
2 अनूज रावत 8
3 राशिद खान 8
4 विराट कोहली 16
5 केएल राहुल 15
6 सुनील नारायण 10

आयपीएलच्या या हंगामात केएल राहुल आणि केन विल्यमसन 'डायमंड डक'चे शिकार ठरले आहेत. म्हणजे हे दोन्ही खेळाडू एकही चेंडू न खेळता आणि खातं न उघडता आऊट झाले. क्रिकेट सामन्यात जेव्हा एखादा फलंदाज एकही चेंडू न खेळता शून्य धावांवर आऊट होतो, तेव्हा त्याला डायमंड डक म्हणतात. जर क्रिजवर दुसऱ्या बाजूला उपस्थित असलेला फलंदाज धावबाद झाल्यानंतर असं घडतं. अशा प्रकारची विकेट खूप कमी पाहायला मिळते.

हे देखील वाचा-