IND vs SA Stats & Records : केपटाऊन येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक विक्रम झाले. भारत आणि आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचा पहिला डाव आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. 55 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचाही डाव कोसळला. केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 23 फलंदाज तंबूत परतले, हा एक विक्रमच झालाय. 


दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात फक्त 55 धावा करु शकला. मोहम्मद सिराज याने सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 20 धावसंख्याही पार करत आली नाही. भारताविरोधात दक्षिण आफ्रिका संघाने निचांकी धावसंख्या नोंदवली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आफ्रिकेचा भारताविरोधातील ही सर्वात कमी धावसंख्या होय. पहिल्या दिवशी तब्बल 23 फलंदाज बाद झाले. भारताचे 10 आणि आफ्रिकेचे 13 फलंदाज माघारी परतले. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ रोमांचक होण्याची शक्यता आहे. एडन मार्करम तळ ठोकून मैदानावर आहे. मार्करमच्या खेळावर आफ्रिकेची मदार अवलंबून आहे. 






भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकली, 6 फलंदाज 0 धावांवर बाद


भारतीय संघ 4 बाद 153 अशा स्थितीमध्ये होता. विराट कोहली मैदानावर तळ ठोकून बसला होता. टीम इंडिया 200 धावांचा पल्ला आरामात पार करेल, असेच सर्वांना वाटत होते. पण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. 153 धावांवरच भारताने उर्वरित 6 विकेट गमावल्या. सहा फलंदाजाला एकही धाव करता आली नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतकी मोठी घसरण पहिल्यांदाच झाली. इतकेच नाही तर भारताच्या डावात सात फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सात फलंदाज शून्यावर माघारी जाण्याची ही दुसरीच वेळ होय. 


121 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड थोडक्यात बचावला...


केपटाउन कसोटीच्या पहिल्या दिवशी 23 फलंदाज बाद झाले. हा एक विक्रमच जालाय. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक विकेट पडण्याचा विक्रम 121 वर्षांपूर्वी झाला होता.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात एकाच दिवशी  25 फलंदाज बाद झाले होते. 1902 मध्ये दोन्ही संघामध्ये कसोटी सामना झाला होता. त्यानंतर केपटाऊन कसोटीत हा नकोसा विक्रम थोडक्यात बचावला.