Ravichandran Ashwin : कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वादामुळे भारतीय क्रिकेट सध्या जगभरात चर्चेत आहे. सोशल मीडियावर क्रीडा चाहते दोन गटात विभागले गेले आहेत. त्यातच आता फिरकीपटू आर. अश्विन यानं माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भर पडली आहे. रवी शास्त्रींचं त्या वक्तव्यामुळे बसखाली चिरडल्यासारखं वाटलं, असं म्हणत आर अश्विन यानं आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आर. अश्विनच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चर्चेत आलं आहे. ESPNcricinfo ला दिलेल्या मुलाखतीत आर. अश्विन यानं आपल्यासोबत घडलेला एक प्रकार सांगितला. यामध्ये रवी शास्त्रींच्या वक्तव्यामुळे अपमानित अन् बसखाली चिरडल्यासारखं वाटल्याचं अश्विन यानं सांगितलं. अश्विन म्हणाला की, '2019 मधील सिडनी कसोटी सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी कुलदीप यादव हा विदेशातील परिस्थितीमध्ये भारताचा अव्वल फिरकीपटू असल्याचं म्हटलं. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियातील कठीण परिस्थितीत पाच विकेट घेतल्या होत्या. कुलदीपसाठी मी आनंदी होतो. पण रवी शास्त्रींच्या त्या वक्तव्यामुळे माझ्या मनाला वेदना पोहचल्या होत्या. रवी शास्त्रींचं ते वक्तव्य ऐकून बस खाली चिरडल्यासारखं झालं होतं. ते वक्तव्य उद्धवस्त करणारं होतं.' तसेच अश्विनची दुखापत आणि फिटनेसवर बोलताना शास्त्रींनी सगळ्यांकडे वेळ आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.
आम्ही सर्वजण रवी शास्त्री यांचा आदर करतो. मला हेही माहितेय की, आपण सर्वजण हव्या त्या गोष्टी बोलू शकतो आणि नंतर त्या मागेही घेऊ शकतो. पण त्याक्षणी मला चिरडल्यासारखं, उद्धवस्त झाल्यासारखं वाटलं. त्या वक्तव्याचा मला त्रास झाला, असं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणारा आर. अश्विन म्हणाला. आपल्या साथीदाराच्या यशाचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे, असं आपण सगळे बोलतो. मीदेखील कुलदीपसाठी आनंदी होतो. चांगली गोलंदाजी करुनही मी पाच विकेट मिळवू शकलो नाही. पण कुलदीपला ऑस्ट्रेलियात पाच विकेट मिळाल्या. हे किती मोठं आहे, हे मला माहिती आहे, असेही अश्विन म्हणाला.
कुलदीपसह संघाच्या यशाचा आनंद घेण्यासाठी आधी संघाचा भाग असल्यासारकं वाटलं पाहिजे. जर मला बसखाली चिरडल्यासारखं वाटत असेल तर मी यशाच्या पार्टीचा भाग कसा होऊ शकतो? तरीही संघाने आयोजित केलेल्या पार्टीला गेलो, कारण भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केली होती, असं अश्विन म्हणाला.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live