Ravichandran Ashwin and Jonny Bairstow : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना भारताच्या आर. अश्विन आणि इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो यांच्यासाठी (Ravichandran Ashwin and Jonny Bairstow)  खास असणार आहे. कारण हा कसोटी करिअरमधील त्यांचा 100 वा सामना असेल. हा सामना अविस्मर्णीय करण्यासाठी दोन्ही खेळाडू जिवाची बाजी लावतील. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या मैदानावर  हा सामना रंगणार आहे. 


भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो धर्मशालामध्ये  आपला 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. अश्विन आणि बेयरस्टो यांनी आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. हे दोन्ही दिग्गज फलंदाज आपलं खास शतक पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरतील. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत मालिकेतील चार चार कसोटी सामने खेळले आहेत. अश्विन तुफान फॉर्मात आहे. आतापर्यंत त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत आपलं योगदान दिलेय. त्यामुळे अश्विन अखेरचा कसोटी सामना खेळणार, हे निश्चित आहे. पण बेयरस्टोची बॅट मालिकेत अद्याप शांतच आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण इंग्लंड बेयरस्टोला 100 वा कसोटी सामना खेळण्याची संधी देऊ शकतं. 


कसोटी मालिकेत दोन्ही खेळाडूंची कामगिरी कशी ?


अश्विन: चार कसोटी सामन्यात रवीचंद्रन अश्विन याने 30.41 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय चार कसोटी सामन्यात फलंदाजीतही त्यान योगदान दिलेय. 


बेयरस्टो: भारतविरोधात कसोटी मालिकेत बेयरस्टोची बॅट शांतच राहिली. आठ डावात त्याला 21 च्या सरासरीने फक्त 170 धावा करता आल्यात.  


दोघांचं करिअर कसं राहिलेय ? 


अश्विन : 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात अश्विन यानं भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. अश्विन यानं 99 कसोटी सामन्यातील 187 डावात त्यानं गोलंदाजी केली. त्यामध्ये  23.91 च्या सरासरीने 507 विकेट घेतल्या आहेत. 140 डावात फलंदाजी करताना 3309 धावाही केल्या आहेत.  


बेयरस्टो :  99 कसोटीमध्ये 36.42 च्या सरासरीने 5974 धावा केल्या आहेत. यादरम्यान 12 शतकं आणि 26 अर्धसतकं ठोकली आहे. 2012 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात बेअयरस्टोनं कसोटीमध्ये पदार्पण केले होते.